नाशिक: मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन

नाशिक। दि. ३ ऑगस्ट २०२६: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-2026 अंतर्गत 124-नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व सर्वसमावेशक करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन 124 नाशिक मध्य विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अपिता ठुबे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी नाशिक यांच्या निर्देशानुसार 124-नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक, राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच पर्यवेक्षक यांची विशेष बैठक आज जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: किरकोळ वादातून कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला ७ वर्षांची सक्तमजुरी

बैठकीत अपिता ठुबे यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 20 जून ते 19 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) 30 जून ते 31 जुलै 2026 या कालावधीत घरोघरी भेट देऊन मतदारांचे गणना अर्ज भरून घेतले. मात्र काही मतदार त्यांच्या संबंधित यादीभागात आढळून आले नसल्याने अशा मतदारांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. या मतदारांचा शोध घेऊन त्यांच्याकडून आवश्यक माहिती व गणना अर्ज भरून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या गणना अर्जांचे वाटप व डिजिटायझेशनची कार्यवाही 8 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू राहणार असून, आतापर्यंत 77.16 टक्के गणना अर्जांचे वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी 52.08 टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. उर्वरित 47.92 टक्के गणना अर्जांबाबत गैरहजर, स्थलांतरित, मयत व दुबार (ASDD) मतदारांच्या याद्या नगरसेवकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोक्सो प्रकरणात सहआरोपी करण्याची धमकी; पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

या याद्यांमधील मतदारांचा प्रत्यक्ष शोध घेऊन ते संबंधित भागात वास्तव्यास असल्यास त्यांचा अचूक पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व आवश्यक माहिती संकलित करून त्यांच्याकडून गणना अर्ज भरून घेण्यासाठी नगरसेवकांनी मदत करावी, असे आवाहन अपिता ठुबे यांनी केले. यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा अपर तहसीलदार अमोल निकम उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: १२३ नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणीला गती; ASDD व अपूर्ण मतदारांच्या यादीचे ४ ऑगस्टला होणार जाहीर वाचन

बैठकीत उपस्थित सर्व नगरसेवकांनी बीएलओंकडून प्राप्त याद्यांतील गैरहजर, स्थलांतरित, मयत व दुबार (ASDD) मतदारांचा शोध घेऊन पात्र मतदारांकडून गणना अर्ज भरून घेण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच 8 ऑगस्ट 2026 पर्यंत संबंधित बीएलओंकडे गणना अर्ज सादर न करणाऱ्या मतदारांची नावे 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अद्ययावत मतदार यादीत समाविष्ट होणार नसल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-2026 नियोजित कालावधीत यशस्वीपणे पूर्ण करून मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व सर्वसमावेशक करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करून बैठकीची सांगता करण्यात आली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790