नाशिक। दि. ३ ऑगस्ट २०२६: भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १२३ नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदार पडताळणी आणि नोंदणीचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत ४ लाख ९६ हजार ४०९ मतदारांपैकी २ लाख ४ हजार ५६७ मतदारांची गणना प्रपत्रे संकलित करण्यात आली आहेत,
अशी माहिती 123 नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (प्रशासन) कुंदन हिरे यांनी दिली आहे.
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरभेटीद्वारे मतदार गणना प्रपत्र भरून त्याचे डिजिटायझेशन करत आहेत. पडताळणीदरम्यान घरभेटीत उपलब्ध न झालेल्या मतदारांची नावे अर्थात ASDD (अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार) यादीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या यादीचे जाहीर वाचन १२३ नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक रोड विभागीय कार्यालय आणि पंचवटी विभागीय कार्यालय येथे दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
ही यादी सर्वसामान्य मतदारांच्या अवलोकनासाठी संबंधित विभागीय कार्यालयांमध्ये तपासणीसाठी उपलब्ध राहणार आहे. मतदारांनी आपल्या नावाची पडताळणी करावी. नाव समाविष्ट करावयाचे असल्यास किंवा प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील नावाबाबत हरकत अथवा आक्षेप असल्यास संबंधित बी.एल.ओ. यांच्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (प्रशासन) श्री. हिरे यांनी केले आहे.
![]()


