नाशिकमध्ये संततधार पाऊस, गंगापूर धरणातून ३,०९९ क्यूसेक विसर्ग

नाशिक | दि. १ ऑगस्ट २०२६: नाशिक शहर आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी व नंदिनी नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पाणलोट क्षेत्रात अद्यापही जोरदार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून शुक्रवारी (दि. ३१ जुलै) ३,०९९ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, शहरात गेल्या २४ तासांत २३.२ मिमी पावसाची नोंद झाली असून नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: साधुग्राममधील प्रत्येक सुविधा भाविकांच्या सुरक्षिततेला पूरक ठरावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

सततच्या पावसामुळे गोदावरी नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. यामुळे गोदाकाठावरील यशवंतराव महाराज देवमामलेदार मंदिर परिसर, म्हसोबा महाराज पटांगण तसेच गौरी पटांगण पाण्याखाली गेले आहे. नदीतील वाढत्या पाण्याचा अंदाज घेत गोदाकाठावरील व्यापाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या टपऱ्या आणि दुकाने सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘अमृत’ मार्फत 'पराक्रम दिना' निमित्त १ ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन

हवामानाचा अंदाज लक्षात घेता पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होऊन पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  निफाड ड्राय पोर्ट ठरणार नाशिकसाठी मोठे मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक्स हब; कृषी निर्यात, उद्योग आणि रोजगाराला मिळणार मोठी चालना

दुसरीकडे, दिवसभर सुरू असलेल्या पावसाचा परिणाम शहरातील जनजीवनावरही झाला. बाजारपेठांतील वर्दळ लक्षणीयरीत्या घटल्याने व्यापारी आणि हातगाडीवरील फेरीवाल्यांचा व्यवसाय ठप्प झाला. ग्राहकांची संख्या कमी झाल्याने अनेक फेरीवाल्यांनी दुपारनंतर आपली दुकाने आवरती घेतली. मात्र, वाढत्या पाणीपातळीमुळे गोदावरी नदीचे रौद्र रूप पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी गोदाकाठावर गर्दी केल्याचे चित्रही शहरात पाहायला मिळाले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790