Amazon

नाशिक: प्रत्येक महाविद्यालयात स्थापन होणार ‘कुंभ कक्ष’; सिंहस्थ २०२७ साठी विद्यार्थी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू

नाशिक। दि. ३० जुलै २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या यशस्वी आयोजनात युवकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये स्वतंत्र ‘कुंभ कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच ‘कुंभदूत’ या विद्यार्थी स्वयंसेवक उपक्रमासाठी ऑनलाइन नोंदणीही सुरू करण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांना QR कोड स्कॅन करून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत ऑनलाइन आढावा बैठक झाली. सिंहस्थासाठी सक्षम स्वयंसेवक यंत्रणा उभारणे, विद्यार्थ्यांचा सामाजिक सहभाग वाढविणे आणि संस्थांशी समन्वयाची रूपरेषा निश्चित करणे, याबाबत बैठकीत चर्चा झाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कागदी टपालाला आळा; ई-ऑफिसचा प्रभावी वापर करा; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश

प्रत्येक शैक्षणिक संस्थेत स्थापन होणारा ‘कुंभ कक्ष’ हा कुंभमेळा प्राधिकरणाशी समन्वय साधणारा प्रमुख दुवा असेल. या कक्षामार्फत विद्यार्थी स्वयंसेवकांची नोंदणी व सहभाग, स्वच्छ कुंभ आणि हरित कुंभ अभियानांचे आयोजन, स्वयंसेवकांचे प्रशिक्षण व घाट, मंदिरे, वाहनतळ, रेल्वे स्थानके, आरोग्य केंद्रे तसेच मदत शिबिरांमध्ये नियुक्ती, माहिती व मदत केंद्रांचे व्यवस्थापन, गर्दी व रांग व्यवस्थापनास सहाय्य, प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक उपक्रम, डिजिटल स्वयंसेवा व समाजमाध्यमांद्वारे जनजागृती, एनएसएस, एनसीसी व अन्य विद्यार्थी संघटनांशी समन्वय तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृती मोहिमा राबविण्यात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी शहराच्या 'या' विविध मार्गातील वाहतुकीत शुक्रवारी (दि. २५) महत्वाचे बदल...

‘कुंभदूत’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेला QR कोड स्कॅन करून ऑनलाइन नोंदणी करायची आहे. नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांनी आवश्यक वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक संस्थेचा तपशील भरायचा असून, त्यानंतर संबंधित महाविद्यालयाच्या ‘कुंभ कक्ष’ आणि कुंभमेळा प्राधिकरणामार्फत पुढील प्रशिक्षण व स्वयंसेवक नियोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  सप्टेंबरमध्येच नाशिककरांना ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; पाणीटंचाईचे सावट

यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेने नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांचे नाव, पदनाम, दूरध्वनी क्रमांक आणि ई-मेल तपशील लवकरात लवकर कुंभमेळा प्राधिकरणाकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याबाबत कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या यशस्वी आयोजनात विद्यार्थी स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. प्रत्येक शैक्षणिक संस्थेत ‘कुंभ कक्ष’ स्थापन झाल्याने स्वयंसेवकांचे नियोजन, प्रशिक्षण आणि समन्वय अधिक प्रभावीपणे करता येईल. राष्ट्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या या पर्वासाठी शैक्षणिक संस्थांचे सहकार्य पूर्वीप्रमाणेच लाभेल, असा विश्वास आहे.”

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790