Amazon

नाशिक: 11 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’; निवृत्त अभियंत्याची 59.58 लाखांची सायबर फसवणूक

नाशिक। दि. २९ जुलै २०२६ — मुंबई पोलिसांचे अधिकारी असल्याची बतावणी करत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवून एका खासगी कंपनीतील सेवानिवृत्त केमिकल अभियंत्याची तब्बल ५९ लाख ५८ हजार रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत तक्रारदाराला मोबाईलवर अनोळखी कॉल आला. कॉल करणाऱ्याने स्वत:ला मुंबई पोलिस विभागातील अधिकारी असल्याचे सांगत, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा खोटा दावा केला. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे सांगून अटक करण्यासाठी पथक नाशिकला रवाना झाल्याची भीतीही दाखविण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रविवार कारंजा परिसरात FDAची धडक कारवाई; ६,६५९ किलो गूळ जप्त; भेसळ व निकृष्ट दर्जाचा संशय

यानंतर सायबर भामट्यांनी तक्रारदाराला कोणाशीही संपर्क साधू नये, प्रकरणाची माहिती कुणालाही सांगू नये, अशा सूचना देत तब्बल ११ दिवस व्हिडिओ कॉलवर ठेवून ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचा प्रकार समोर आला. या काळात त्यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यात आले.

भामट्यांनी तपास पूर्ण होईपर्यंत बँकेत असलेली रक्कम शासनाच्या खात्यात जमा करावी, अशी खोटी माहिती देत विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले. अटकेची भीती आणि सामाजिक बदनामीच्या भीतीपोटी तक्रारदाराने वेळोवेळी मोठ्या प्रमाणात रक्कम संबंधित खात्यांमध्ये वर्ग केली.

🔎 हे वाचलं का?:  मेडिलिव्ह हॉस्पिटल, नाशिक आणि अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई यांच्या संयुक्त यकृत प्रत्यारोपण उपक्रमामुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मिळाले नवे जीवन !

सर्व बचत संपल्यानंतरही भामट्यांनी अधिक पैशांसाठी तगादा लावला. त्यानंतर तक्रारदाराने आपल्या भाच्याकडे आर्थिक मदत मागितली. संशय आल्याने भाच्याने संपूर्ण प्रकाराची चौकशी केली असता हा ‘डिजिटल अरेस्ट’ च्या नावाखालील सायबर फसवणुकीचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तोपर्यंत आरोपींनी खात्यातील सर्व रक्कम लंपास केली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कागदी टपालाला आळा; ई-ऑफिसचा प्रभावी वापर करा; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

सायबर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. सीबीआय, ईडी, कस्टम, पोलिस किंवा इतर तपास यंत्रणा कोणालाही व्हिडिओ कॉलद्वारे चौकशी करत नाहीत किंवा पैसे शासकीय खात्यात जमा करण्याचे निर्देश देत नाहीत. अशा प्रकारचे कॉल आल्यास घाबरून न जाता त्वरित कुटुंबीयांना माहिती द्यावी. संशयास्पद कॉल किंवा व्हिडिओ कॉल सुरू असल्यास इंटरनेट सेवा बंद करून तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा जवळच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790