नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा रिंगरोडच्या अलाइनमेंट बदलाची उच्चस्तरीय चौकशी करणार

मुंबई/नाशिक। दि. १० जुलै २०२६: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी प्रस्तावित बाह्य रिंगरोड प्रकल्पात कमीत कमी भूसंपादन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू असून, मातोरी आणि मुंगसरे परिसरातील रिंगरोडच्या अलाइनमेंटमध्ये काही विशिष्ट व्यक्तींना लाभ मिळावा म्हणून बदल करण्यात आला आहे का, याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थासाठी साधुग्राम, मंडप व्यवस्थेचा आढावा; २०१५च्या कुंभमेळ्यातील अनुभवाचा नियोजनात उपयोग

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रिंगरोडच्या अलाइनमेंटमध्ये बदल झाल्याबाबत सदस्य विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी सदस्य सरोज अहिरे यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, हा रिंगरोड भविष्यातील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प असून, तो राबविताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य व समाधानकारक मोबदला देण्यावर शासनाचा भर राहील. शक्य तितके कमी भूसंपादन करून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मोजणीच्या वेळी काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट व अन्य संरक्षक साहित्याचा वापर केला होता. मात्र, प्रकल्पाबाबत कोणावरही अन्याय होणार नाही, याची शासन दक्षता घेईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासह अत्याधुनिक सुविधा देण्यास कटिबद्ध- मंत्री प्रकाश आबिटकर

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, या प्रकरणाची अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. रिंगरोडच्या अलाइनमेंटमध्ये तीन वेळा करण्यात आलेल्या बदलांची सखोल तपासणी केली जाईल. चौकशी अहवालानुसार दोषी अधिकारी किंवा संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, शासनाला जमीन देण्याच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला असेल किंवा अलाइनमेंट बदलाची पूर्वकल्पना घेऊन शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करण्यात आल्या असतील, तर संबंधितांवरही नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790