नाशिक: पावसाळी आव्हानांचा प्रत्यक्ष अभ्यास; कुंभमेळा विकास प्राधिकरणाची शहर व त्र्यंबकेश्वरमध्ये व्यापक पाहणी

नाशिक। दि. ९ जुलै २०२६: पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा पावसाळ्यात होत असल्याने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करून संभाव्य अडचणी आतापासूनच ओळखण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर येथे व्यापक पाहणी मोहीम राबविली. या पाहणीत वाहतूक, जलनिस्सारण, साधूग्राम, घाट परिसर, स्वच्छता आणि आपत्कालीन व्यवस्थापनाशी संबंधित विविध बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

मंगळवारी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी त्र्यंबकेश्वर येथे नियोजित साधूग्राम, घाट परिसर तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता, पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह, जलनिस्सारण व्यवस्थेची परिणामकारकता, भाविक व साधू-महंतांसाठी सुरक्षित प्रवेश व आपत्कालीन स्थलांतर मार्ग, प्रस्तावित साधूग्राम परिसराची उपयुक्तता तसेच अतिरिक्त नाले, पंपिंग व्यवस्था आणि भूसपाटी उंचावण्याची आवश्यकता यांचा आढावा घेण्यात आला. नव्याने उभारण्यात येणाऱ्या घाटांच्या कामांचीही पाहणी करून पूरस्थिती, सुरक्षितता आणि भाविकांच्या हालचालींच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: लग्नासाठी अघोरी पूजा ! अर्ध्या रात्री स्मशानात नेले, महिलेची ७७ हजारांची फसवणूक

बुधवारी कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, उपजिल्हाधिकारी मीनाक्षी राठोड, मुख्याधिकारी अमोल चौधरी तसेच तहसीलदार मकरंद दिवाकर आणि विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिक शहरातील प्रमुख रस्ते, चौक, रेल्वे स्थानक परिसर आणि कुंभमेळ्याशी संबंधित महत्त्वाच्या मार्गांची पाहणी केली.

या पाहणीदरम्यान पावसामुळे वाहन व पादचारी वाहतुकीवर होणारा परिणाम, पाणी साचणारी ठिकाणे, वाहतूक कोंडी निर्माण होणारे बॉटलनेक, सुरू असलेल्या कुंभ विकासकामांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, पावसाच्या पाण्याचा निचरा, नाले, कल्व्हर्ट आणि रस्त्यांवरील आउटफॉलची कार्यक्षमता यांचा आढावा घेण्यात आला. तसेच भाविकांसाठी सुरक्षित पादचारी मार्ग, फुटपाथ आणि आपत्कालीन सेवांच्या वाहनांना अखंड प्रवेश उपलब्ध राहील, यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘आईला २५ हजार देतो’ म्हणत तरुणीला जाळ्यात ओढले; बनावट लग्नातून २ लाख उकळले

गोदावरी घाट परिसरात नदीच्या पाणीपातळीचा घाटांवरील हालचालींवर होणारा परिणाम, घाट आणि संपर्क मार्गांवरील पाणी साचणारी किंवा घसरडी ठिकाणे, प्रवेश-निर्गमन मार्गांवरील संभाव्य गर्दी, रांग व्यवस्थापन, नदीकिनारी जलनिस्सारण व्यवस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीत बचाव आणि स्थलांतरासाठी उपलब्ध मार्गांची तपासणी करण्यात आली.

स्वच्छता व्यवस्थेच्या दृष्टीने तात्पुरत्या स्वच्छतागृहांसाठी पूरप्रवण ठिकाणे, नाल्यांमधील ओव्हरफ्लो, सांडपाण्याचा उलटा प्रवाह, साचलेले सांडपाणी, नाल्यांमध्ये अडकणारा घनकचरा, पावसाळ्यात स्वच्छता आणि मलनिस्सारण यंत्रणांच्या वाहनांना होणाऱ्या अडचणी तसेच दुर्गंधी, डासांची उत्पत्ती आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित संभाव्य धोक्यांचाही आढावा घेण्यात आला.

या सर्व पाहण्यांमधून प्राप्त झालेल्या निरीक्षणांच्या आधारे प्रत्येक ठिकाणासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात येणार असून संबंधित विभागांच्या समन्वयातून जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करणे, वाहतूक सुलभ करणे, स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करणे आणि सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान भाविकांना सुरक्षित व अखंड सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘शिक्षण उत्सव २०२६’मधून शिक्षकांच्या कार्याचा गौरव; संवाद, नवोपक्रम आणि सहकार्याला नवी दिशा

याबाबत आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “सिंहस्थ कुंभमेळा पावसाळ्यात होत असल्यामुळे प्रत्यक्ष पावसामध्ये विविध ठिकाणांची पाहणी करून संभाव्य अडचणींची ओळख करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यंदाच्या पावसाळ्यातील प्रत्येक निरीक्षणाचा उपयोग पुढील वर्षीच्या सिंहस्थ नियोजनासाठी केला जाईल. जलनिस्सारण, वाहतूक, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांमध्ये आवश्यक ते कायमस्वरूपी बदल करून भाविक, साधू-महंत आणि नागरिकांसाठी सुरक्षित, सक्षम आणि सुरळीत कुंभमेळा आयोजित करण्यासाठी प्राधिकरण सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने काम करत आहे.”

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790