Amazon

नाशिक: पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली; बाजारात दरांनी घेतली उसळी

नाशिक। दि. ८ जुलै २०२६: जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाचा परिणाम आता भाजीपाल्याच्या बाजारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. शेतातून भाजीपाला काढण्यास येणाऱ्या अडचणी, चिखलामुळे वाहतुकीचा वेग मंदावणे आणि इतर राज्यांकडे होणारी निर्यात यामुळे बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी बहुतांश भाज्यांचे दर ८० ते १२० रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढले असून, कोथिंबिरीच्या दराने तब्बल १४० रुपयांचा टप्पा गाठला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रवासी बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, ७ ते ८ जखमी

बाजार समितीतील आकडेवारीनुसार, नियमितपणे दररोज आठ ते नऊ हजार जुड्यांची आवक होणाऱ्या कोथिंबिरीची मंगळवारी केवळ चार हजार जुड्यांची नोंद झाली. आवक निम्म्यावर आल्याने कोथिंबिरीला प्रतिजुडी १४० रुपयांपर्यंत दर मिळाला. याशिवाय मेथी ८० रुपये, कांदापात ६० रुपये, शेपू ४० रुपये आणि पालक ३० रुपये प्रतिजुडी दराने विक्री झाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये साकारणार फुटबॉलचे अत्याधुनिक मैदान; हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर लावणार फ्लडलाईस्

फळभाज्यांच्या आवकेतही मोठी घट झाली आहे. घेवड्याची केवळ ८५ क्विंटल आवक झाल्याने त्याचे दर ५० ते १२० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले. गवारची आवक पूर्णपणे ठप्प राहिली, तर भेंडीची अवघी एक क्विंटल आवक बाजारात झाली.

किरकोळ बाजारातही महागाईचा फटका कायम असून वालपापडी आणि घेवडा १२० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत. गवार, शेवगा, गिलके आणि दोडके यांचे दरही शंभर रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. भेंडी आणि हिरवी मिरचीसाठी ग्राहकांना ८० रुपये प्रतिकिलो मोजावे लागत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विद्यार्थ्यांना अडवून लुटणारा संशयित चेंबूरमधून जेरबंद; २४ तासांत गुन्ह्याचा छडा

बाजार समितीतील पालेभाज्यांचे दर (प्रतिजुडी):

  • कोथिंबीर : ३० ते १४० रुपये
  • मेथी : २५ ते ८० रुपये
  • कांदापात : २० ते ६० रुपये
  • शेपू : २० ते ४० रुपये
  • पालक : १० ते ३० रुपये

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790