Amazon

त्र्यंबकेश्वर: साधूग्रामचे काम आतापासूनच सुनियोजित करण्याचे निर्देश

नाशिक। दि. ८ जुलै २०२६: नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळा आणि पावसाळा एकाच वेळी येत असल्याने साधूग्रामचे काम आतापासूनच सुनियोजित करावे. पावसाळ्यात कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

मंत्री श्री. महाजन यांनी मंगळवारी दुपारी त्र्यंबकेश्वर येथे नियोजित साधूग्राम, घाट परिसराला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी बोलत होते. यावेळी नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता, तहसीलदार गणेश जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव आदी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये साकारणार फुटबॉलचे अत्याधुनिक मैदान; हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर लावणार फ्लडलाईस्

मंत्री श्री. महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अहिल्याकुंड परिसरालगतच्या नियोजित साधूग्रामच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, नियोजित साधूग्राम परिसरात पावसाचे पाणी साचल्याचे निदर्शनास आले. आगामी कुंभमेळ्याच्या कालावधीत अशाच प्रकारची अतिवृष्टी झाल्यास भाविक, साधू-महंत तसेच प्रशासनाला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी आवश्यक नियोजन करावे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रवासी बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, ७ ते ८ जखमी

यावेळी त्यांनी नदीपात्रात उभारण्यात येत असलेल्या नवीन घाटांच्या कामांचीही पाहणी करून कामांचा दर्जा, सुरक्षितता आणि पूरस्थितीचा विचार करून आवश्यक उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले. साधूग्राम परिसरात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन पर्यायी जागेचीही पाहणी करण्यात आली. संभाव्य धोके लक्षात घेऊन आणि सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून आवश्यक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी कुंभमेळ्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790