हिट अँड रन: राणेनगर उड्डाणपुलाजवळ कारच्या धडकेत मजूर दाम्पत्याचा मृत्यू

नाशिक। दि. २८ जून २०२६: मुंबई-आग्रा महामार्गावरील राणेनगर ते इंदिरानगरदरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान रस्ता ओलांडणाऱ्या मजूर दाम्पत्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघातानंतर चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला.

🔎 हे वाचलं का?:  मोठी बातमी! 'टीईटी'चा पेपर फुटला, रविवारी (दि. २८) होणारी TET ची परीक्षा रद्द

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. ५६ वर्षीय नन्नेभाई भगवानदास आदिबासी आणि त्यांची ५५ वर्षीय पत्नी राधारानी आदिबासी हे गेल्या चार महिन्यांपासून उड्डाणपुलाच्या कामावर मजुरी करत होते. कामाची वेळ संपण्यास अवघा अर्धा तास शिल्लक असताना दोघेही महामार्ग ओलांडत असताना भरधाव कारने त्यांना धडक दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये शीतगृह उभारणीसाठी महानगरपालिकेकडून जागा उपलब्ध करून देणार – मंत्री उदय सामंत

अपघातात गंभीर जखमी झालेल्या दाम्पत्याला नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नन्नेभाई यांचा शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर राधारानी यांनी शनिवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला.

अपघातानंतर कारचालक वाहन घटनास्थळी सोडून पसार झाला. पोलिसांनी वाहन ताब्यात घेत अंबड पोलिस ठाण्यात आणले असून, संबंधित चालकाचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्ता सुरक्षा आणि कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790