नाशिक: रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे ६३४ ग्रॅम सोन्याची लगड अवघ्या चार तासांत मालकाकडे परत

नाशिक। १४ जून २०२६: अधिक मासानिमित्त देवदर्शनासाठी नाशिकमध्ये आलेल्या छत्तीसगडमधील एका सराफ व्यावसायिकाची सोन्याची लगड व रोख रक्कम असलेली बॅग रिक्षात विसरली गेली. मात्र रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे आणि सरकारवाडा पोलिसांच्या तत्परतेमुळे तब्बल ६३४ ग्रॅम सोन्याची लगड व ४३ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग अवघ्या चार तासांत संबंधित व्यापाऱ्याला सुखरूप परत मिळाली.

रायपूर (छत्तीसगड) येथील सराफ व्यावसायिक प्रवीण सोनी हे आई, पत्नी आणि मुलीसह अधिक मासानिमित्त नाशिकमध्ये दर्शनासाठी आले होते. शहरातील रस्त्यांची माहिती नसल्याने त्यांनी आपली कार पंचवटी परिसरात उभी करून रामकुंड येथे जाण्यासाठी रिक्षाचा वापर केला. स्नानासाठी रामकुंडावर पोहोचल्यानंतर रिक्षातून उतरताना त्यांची बॅग रिक्षामध्येच राहून गेली. काही वेळाने बॅगेत सोन्याची लगड आणि रोकड असल्याचे लक्षात येताच त्यांनी रिक्षाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना यश आले नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तांत्रिक सल्लागार समितीकडून नाशिकमधील कुंभस्थळांची पाहणी

दरम्यान, रिक्षाचालक देविदास देशमुख (वय ६०) यांच्या निदर्शनास रिक्षामध्ये विसरलेली बॅग आली. बॅग न उघडता त्यांनी ती थेट सरकारवाडा पोलिस ठाण्यात जमा केली. यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी पोलिसांच्या अंतर्गत संदेश प्रणालीवर संबंधित माहिती प्रसारित करून, अशा प्रकारची तक्रार आल्यास संबंधित व्यक्तीला सरकारवाडा पोलिस ठाण्यात पाठविण्याच्या सूचना दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक तहसील कार्यालयातर्फे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव

दुसरीकडे, प्रवीण सोनी यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात बॅग हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांना सरकारवाडा पोलिसांकडून आलेला संदेश पाहिल्यानंतर त्यांना तेथे पाठविण्यात आले. सरकारवाडा पोलिसांनी सोनी यांची सविस्तर चौकशी करून बॅगेची मालकी निश्चित केली.

ओळख पटविण्याच्या प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी सोन्याची लगड स्वतंत्रपणे सुरक्षित ठेवली होती. बॅग तपासताना त्यामध्ये सोन्याची लगड दिसून न आल्याने सोनी यांची क्षणभर चिंता वाढली. कारमध्ये ठेवलेल्या दुसऱ्या बॅगेत दागिने राहिले असावेत, अशी त्यांची समजूत झाली. मात्र सर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना थांबवून सुरक्षित ठेवलेली सोन्याची लगड आणि रोख रक्कम त्यांच्या ताब्यात दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘अमृत’ मार्फत 'पराक्रम दिना' निमित्त १ ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन

मुंबईतील कारागिराकडून दागिने तयार करून घेण्यासाठी नाशिकहून परतताना हे सोने सोबत घेऊन जात असल्याची माहिती प्रवीण सोनी यांनी दिली. या घटनेमुळे रिक्षाचालक देविदास देशमुख यांच्या प्रामाणिकपणाचे तसेच सरकारवाडा पोलिसांच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या संपुर्ण कारवाईत पोलीस हवालदार चंदर दळवी, संदिप उघडे, आणि महिला पोलीस अंमलदार आव्हाड यांनी महत्त्वाची भुमिका बजावली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790