नाशिक। दि. ८ जून २०२६: रब्बी हंगाम २०२६ अंतर्गत किंमत स्थिरीकरण निधी (PSF) योजनेंतर्गत खरेदी प्रक्रिया सुरळीतपणे सुरू करण्यासाठी संबंधित संस्थांनी तात्पुरते एपीएमसी परवाने तातडीने प्राप्त करून खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्याच्या सूचना नाफेड, नाशिक शाखेने दिल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ६ जून रोजी झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार नाफेडने विविध प्राथमिक कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय संस्था व शेतकरी संघटनांना संबंधित कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून (एपीएमसी) तात्पुरते परवाने मिळविण्यासाठी तातडीने पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले आहेत.
संबंधित संस्थांनी एपीएमसीकडून तात्पुरता परवाना मंजूर झाल्याबाबतचे पत्र प्राप्त करून त्याची प्रत ७ जून २०२६ पर्यंत नाफेडच्या नाशिक शाखेकडे सादर करावी, असेही कळविण्यात आले आहे. तसेच खरेदी प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय व तांत्रिक पूर्तता प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शेतमाल खरेदी केंद्रे संबंधित बाजार समितीच्या आवारात सुरू करण्यासाठी स्थानिक एपीएमसीशी समन्वय साधण्यावर भर देण्यात आला असून शेतकऱ्यांना वेळेवर आणि सुलभ खरेदी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कार्यवाही महत्त्वाची मानली जात आहे.
नाफेडने या विषयाला अत्यंत तातडीचे स्वरूप असल्याचे नमूद करत सर्व संबंधित संस्थांनी प्रगती अहवाल प्राधान्याने सादर करावा, असे आवाहन केले आहे.
![]()

