
नाशिक। दि. ६ जून २०२६: सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ‘गोल्डमॅन’ लूटप्रकरणाचा उलगडा करण्यात सातपूर पोलिस आणि गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाला यश आले आहे. तब्बल दोन महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत असलेल्या टोळीतील मुख्य संशयिताला चार जिल्ह्यांमध्ये पाठलाग करून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे १४ लाख रुपये किमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे.
ही घटना २३ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सातपूर स्टँड परिसरात घडली होती. टेलरिंगचे दुकान बंद करून कारने घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी वाहन अडवून चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि गळ्यातील दोन सोन्याच्या चेन हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. संशयित वारंवार ठिकाणे बदलत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याचा जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये शोध घेण्यात आला.
गुन्हे शाखा युनिट-२चे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर आणि पोलीस अंमलदार महेश खांडबहाले यांच्या पथकाने संशयित संभाजी विलास कवळे (रा. आनंदवली) याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याच्याकडून जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथून सुमारे १०.५ तोळे वजनाची आणि अंदाजे १४ लाख रुपये किमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आली. या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू असून पुढील तपास सातपूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
![]()

