नाशिक: कोरोना काळात वैद्यकीय शिक्षणाचे महत्व अधोरेखित झालेय – राज्यपाल कोश्यारी

नाशिक (प्रतिनिधी): कोरोना संकटाच्या या काळात संपूर्ण जगात वैद्यकीय शिक्षणाचे महत्व प्रकर्षाने अधोरेखित झाले असून सद्यस्थितीत डॉक्टरांचे काम सर्वात कठीण तर आहेच त्याचबरोबर चांगले डॉक्टर निर्माण करणे त्याहूनही कठीण असे आहे. परंतु आंतरिक उर्जा असेल तर सर्वच प्रकारच्या उर्जा कशा आपोआप संचारतात याचा अनुभव आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रूपाने संपूर्ण देशाने घेतला असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे.

नाशिक येथे आज आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे नुतनीकरण व सौर उर्जा रुफ टॉप प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते, विद्यापीठाच्या ऑडिटोरीयम मध्ये झालेल्या या कार्यक्रमास अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री तथा प्रति कुलपती अमित देशमुख, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने,  कुलगुरू प्रा.डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति कुलगुरू प्रा. डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण तसेच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे आदी उपस्थित होते.

हे ही वाचा:  नाशिकसह राज्यात दोन दिवस मध्यम पावसाची शक्यता

यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, नेतृत्वाशिवाय फॉलोअर्स काहीच करू शकत नाही. खऱ्या नेत्याची ओळख कठीण प्रसंगी, युद्ध प्रसंगी होते. करोना काळात सर्वत्र परीक्षा नको असा सूर असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी धैर्य दाखवीत आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला तसेच सर्व परीक्षा यशस्वी रित्या घेऊन दाखविल्या यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत. भविष्य  काळात विद्यापीठात अॅलोपॅथी, आयुर्वेदिक, होमियोपॅथी, फिजिओथेरपी या सारख्या अभ्यासक्रमांचे उच्च शिक्षण देणारे महाविद्यालय सुरु होणार असून येणाऱ्या काळात इमारतीच्या नूतनीकरणासोबत बुद्धिमत्तेचेही नूतनीकरण आपणास पहावयास मिळणार आहे; असे सांगून राज्यपाल कोश्यारी यांनी विद्यापीठांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास सतत धरावयास हवा असेही सांगितले.

हे ही वाचा:  नाशिक: शहरातील ४६७ धोकेदायक इमारतींचे वीज, पाणी खंडित होणार !

आता दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून आपण आता त्याचा सामना करण्याची भूमिका स्वीकारली आहे. या संकटात केंद्र सरकार, राज्य शासन यांनी जे ठरवले, लोकांनीही त्याचे अनुकरण केले. ‘डरा सो मरा’ असे हिंदीत बोलले जाते,  आपण भयाने खचून न जाता त्याचा सामना करायला शिकले पाहिजे, निष्काळजी  न राहता सावधान राहिले पाहिजे तरच आपण कोरोना आणि त्याहीपेक्षा मोठ्या संकटाचा सामना करू शकतो. सर्वच वैद्यकीय शाखांचे त्यांचे स्वतःचे एक वेगळे अस्तित्व आणि महत्व आहे. या सर्वच विद्याशाखांनी इम्युनिटी हा कोरोना वरील सर्वोत्तम उपचार असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वच वैद्यकीय विद्याशाखांना त्यासाठी काम करण्याचे मोठे आव्हान असल्याचेही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी सांगून जगातील क्लीन व ग्रीन एनर्जी असलेल्या सौर उर्जेच्या प्रचार, प्रसारासाठी कार्य करण्याचेही आवाहन यावेळी केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790