तापमानात घट; उकाडा कायम, महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन ७ ते ९ जूनदरम्यान अपेक्षित

नाशिक, दि. १४ मे २०२६: गेल्या चार दिवसांपासून चाळिशीपार स्थिरावलेल्या तापमानामुळे नाशिककरांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागत होता. मात्र बुधवारी (दि. १३) कमाल तापमानात काहीशी घसरण नोंदविण्यात आली. ४१.२ अंश सेल्सिअसवर पोहोचलेला पारा थेट ३८.५ अंशांपर्यंत खाली आला. गुरुवारी (दि. १४) किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तापमानात घट झाली असली तरी वातावरणातील उकाड्याची तीव्रता अद्याप कायम आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

यंदाच्या उन्हाळ्यात नाशिकमध्ये विक्रमी उष्णतेची नोंद होत असून, सलग चार दिवस कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे राहिल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कुलाबा वेधशाळेकडून गुरुवारपर्यंत नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, दुपारच्या वेळेत तीव्र उष्णतेचा चटका जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी किमान तापमान २६ अंशांपर्यंत गेले होते. त्यात सध्या किंचित घट झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

दरम्यान, अनुकूल हवामान परिस्थितीमुळे नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रवासाला गती मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, शनिवारपर्यंत (दि. १६ मे) मान्सून अंदमान-निकोबार बेटे, दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्राच्या काही भागांत दाखल होण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये मान्सूनचे आगमन ३ ते ५ जूनदरम्यान अपेक्षित असून, तळकोकणात तो ७ ते ९ जूनदरम्यान पोहोचण्याचा अंदाज आहे. मुंबई आणि पुण्यात मान्सून १२ ते १४ जूनदरम्यान दाखल होऊ शकतो.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांसह पूर्व राजस्थान, मध्य भारत आणि गुजरातच्या काही भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790