यंदाच्या पावसावर एल निनोचे सावट; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

नाशिक। दि. २३ एप्रिल २०२६: यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा संभाव्य परिणाम लक्षात घेता राज्य जलसंपदा विभागाने नाशिक महापालिकेला धरणातील पाण्याचा कोटा जपून वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने जून ते ऑगस्ट या कालावधीत एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर प्रशासनाने आगाऊ नियोजनावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. संभाव्य कमी पावसाचा अंदाज गृहित धरून पाणी व्यवस्थापन काटेकोर ठेवण्यावर भर देण्यात येत आहे.

महापालिका प्रशासनाने नागरिकांना दिलासा देत शहरासाठी सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. गंगापूर, मुकणे आणि दारणा या धरणांमधील साठा ऑगस्टच्या मध्यापर्यंत पुरेल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. २०२५-२६ या कालावधीसाठी एकूण ६,४०० दशलक्ष घनफूट पाणी राखीव ठेवण्यात आले असून, त्यापैकी १४ एप्रिलपर्यंत ३,७९८ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. सध्या २,६०२ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिगारेट देण्यास नकार दिल्याने तरुणाचा खून

तथापि, नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन नियमित पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे हेच प्राधान्य असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. २०२३ मधील एल निनो परिस्थितीत जुलै-ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने पाणी कपातीची वेळ आली नव्हती, असा अनुभवही प्रशासनाने नोंदवला आहे.

सध्या पाणी कपात लागू करण्याचा कोणताही निर्णय नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, जलसंपदा विभागाच्या सूचनांनुसार पाण्याचा काटकसरीने वापर, गळती रोखणे, पुनर्वापर वाढवणे आणि अनावश्यक वापर टाळणे यावर भर दिला जाणार आहे. भविष्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास टप्प्याटप्प्याने उपाययोजना राबवण्यात येतील. नागरिकांनीही पाणी बचतीची सवय अंगीकारावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार

नाशिक शहरासाठी राखीव ठेवलेल्या ६,४०० दशलक्ष घनफूट पाण्यात गंगापूर धरणातून ४,६००, मुकणे धरणातून १,५०० आणि दारणा धरणातून ३०० दशलक्ष घनफूट पाण्याचा समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या मते, उपलब्ध साठा सध्या पुरेसा असला तरी संभाव्य दुष्काळी स्थिती लक्षात घेता दक्षता आवश्यक आहे.

एल निनो म्हणजे काय?
एल निनो ही प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानात वाढ झाल्याने निर्माण होणारी हवामानिक घटना आहे. यामुळे जागतिक हवामानात बदल घडतात आणि भारतातील मान्सूनवरही त्याचा परिणाम जाणवतो. एल निनो सक्रिय असल्यास पावसाचे प्रमाण घटणे, पावसाला उशीर होणे किंवा खंड पडणे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. परिणामी जलस्रोतांवर ताण येऊन शेती, पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परिस्थितीत आगाऊ नियोजन आणि पाण्याचा संयमी वापर महत्त्वाचा ठरतो.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790