राज्यात उष्णतेचा कहर; काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता, मे मध्ये ‘रेड झोन’चा इशारा

मुंबई/नाशिक। दि. १८ एप्रिल २०२६: राज्यातील हवामानात सध्या तीव्र आणि टोकाचे बदल जाणवत असून उष्णतेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शुक्रवारी वर्धा आणि अमरावती येथे कमाल ४४.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, ज्यामुळे ही शहरे राज्यातील सर्वाधिक उष्ण ठिकाणे ठरली.

दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार १९ ते २१ एप्रिलदरम्यान कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर २४ एप्रिलपासून तापमान सरासरीपेक्षा सुमारे ४ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. पुढे ८ मेनंतर राज्यातील बहुतांश भाग ‘रेड झोन’मध्ये जाण्याची शक्यता असून रात्रीचे तापमानही ३० अंशांच्या जवळपास पोहोचण्याचा अंदाज आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत दिवसासोबतच रात्रीची उष्णताही तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण वृत्तीचा स्वीकार करावा- पोलिस महासंचालक सदानंद दाते

नाशिक, संभाजीनगरमध्ये उष्णतेची लाट:
शनिवार (दि. १८ एप्रिल) रोजी नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि जळगाव या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ प्राध्यापकांची भरती

उष्णतेमागील कारणे:
राज्यात वाढत्या तापमानामागे काही महत्त्वाचे हवामान घटक कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या परिसरात ३.१ ते ५.८ किमी उंचीवर प्रति-चक्रवात (अँटी-सायक्लोन) सक्रिय झाला असून तो उष्णतेची तीव्रता कायम ठेवत आहे. तसेच उत्तरेकडून वाहणारे कोरडे वारे सातत्याने राज्यावर परिणाम करत आहेत. याशिवाय, सध्या दमट वा बाष्पयुक्त वाऱ्यांचा अभाव असल्याने आकाश निरभ्र राहून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790