राज्यात उष्णतेची तीव्रता वाढणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट

नाशिक/पुणे। दि. ११ एप्रिल २०२६: राज्यात तापमानात वाढ होत असून उष्णतेची लाट तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः पश्चिम किनारपट्टीवर उष्ण व दमट हवामानाचा प्रभाव जाणवत असून, नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने शनिवारी राज्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात- शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे

शुक्रवारी विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर छत्रपती संभाजीनगर येथे ३७.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील विविध भागांत तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र होत आहे.

गुजरातपासून केरळपर्यंतच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांत उष्ण व दमट हवामानाचा प्रभाव वाढला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या किनारी भागांमध्येही उकाडा वाढल्याचे चित्र आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आजपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन

दरम्यान, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चढत असून, नागरिकांना पुन्हा उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी उष्णतेपासून संरक्षणात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790