नाशिक (प्रतिनिधी) : महापालिकेकडून गंजमाळ परिसरात घरकुल योजनेअंतर्गत घरे बांधण्यात आली होती. मात्र, काही महिन्याभरातच या घराची दुरावस्था झाली असून, छतांची गळती होते, भिंतीभोवती घुशींनी बिळे केली, फारश्या फुटल्या, स्लॅबचे प्लास्टर निखळून पडते. यामुळे तेथील रहिवाशी नागरिकांकडून महापालिकेने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
गंजमाळ परिसरात झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे घरकुल योजनेअंतर्गत पुनर्वसन झाले. मात्र महापालिकेडून बांधण्यात आलेल्या या घरांची अवस्था बिकट झाली असून घरांचा दर्जा निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. या घरांमध्ये राहत असताना येथिल लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतं आहे. त्यात पावसाळा असल्यामुळे घरांची छते मोठ्या प्रमाणावर गळत असून, दरवाज्याच्या बिजागऱ्याही खिळखिळ्या झाल्या आहेत. म्हणून तेथील रहिवास्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.