नाशिक। दि. ४ एप्रिल २०२६: महापालिकेच्या ४८ तासांच्या पाणीपुरवठा बंद निर्णयाचा परिणाम शनिवारी पहिल्याच दिवशी शहरात तीव्रतेने जाणवला. सकाळपासूनच नळ कोरडे पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः धावाधाव करावी लागली. अनेकांना टँकरच्या शोधात शहरभर फिरावे लागले, तर काहींनी साठविलेल्या पाण्यावरच दिवस काढला.
महापालिकेकडून जलवाहिन्यांची दुरुस्ती, गळती रोखणे, नवीन जोडण्या देणे आणि जलशुद्धीकरण केंद्रातील कामे एकाच वेळी हाती घेतल्याने शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, या काळात पर्यायी व्यवस्था न केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
नाशिक पूर्व, पश्चिम, पंचवटी, सातपूर, नाशिक रोड आणि नवीन नाशिकसह शहरातील बहुतेक भागांत पाण्याचा पूर्ण तुटवडा जाणवला. कलानगर, गांधीनगर, देवळाली, त्र्यंबक रोड आणि गंगापूर रोड परिसरातही परिस्थिती गंभीर होती. अनेक कुटुंबांना मर्यादित साठ्यावरच दिवस काढावा लागला.
या पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका महिलांना बसला. घरकाम, स्वयंपाक आणि मुलांची देखभाल यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागला. दुसरीकडे, नोकरदार वर्गालाही अडचणींचा सामना करावा लागला. काहींना अंघोळ किंवा नाश्ता न करता कामावर जावे लागले, तर काहींनी उशीर अथवा रजा घेण्याचा पर्याय निवडला.
पाणीपुरवठा ठप्प झाल्याने शहरात टँकरवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात वाढले. सोसायट्यांकडून टँकर मागविण्यासाठी चढाओढ सुरू होती. पिण्याच्या पाण्यासाठी जार आणि बाटलीबंद पाण्याची मागणीही वाढली असून, त्याचे दरही वाढल्याचे दिसून आले. परिणामी, नागरिकांच्या खर्चातही वाढ झाली आहे. दरम्यान, आणखी एक दिवस पाण्याविना कसा काढायचा, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे.
आज दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण होणार:
महापालिकेच्या वतीने गंगापूर धरण येथे क्रॉसींगचे काम ३५ कर्मचाऱ्यांनी २ शिफ्टमध्ये केल्याने ७० % काम पूर्ण झाले आहे. इतर कामही झपाट्याने पूर्ण करत आहोत. गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्राजवळ १२ बंगला येथून आलेल्या १२०० व्यासाच्या जलवाहीनीचे तर तेथून पुढे नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्राकडे जाणाऱ्या ९०० व्यासाच्या जलवाहीनीचे काम २५ कर्मचारी करत असून ते देखील ५०% झाले आहे. नाशिकरोडला जलशुध्दीकरण केंद्रावजळ ९०० व्यासाच्या जलवाहीनीचे क्रॉसिंग व कटींगचे काम दोन शिफ्टमध्ये २० कर्मचाऱ्यांनी केले. ते ६०% झाले आहे. वेळेच्या आधी कामे पूर्ण होणार आहेत. – रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, नाशिक महानगरपालिका
![]()

