चैत्र यात्रोत्सव: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला सप्तशृंग गड येथे तयारीचा आढावा

नाशिक। दि. २२ मार्च २०२६: वणी गडावरील चैत्र यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी सप्तशृंग गड (ता. कळवण) येथे भेट देऊन विविध सुविधा व व्यवस्थांची पाहणी करीत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

वणी गडावरील श्री सप्तश्रुंगी देवीचा यात्रोत्सव 26 मार्चपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलिस निरीक्षक टेंभेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता श्रीमती वसावे यांच्यासह वीज वितरण, जिल्हा परिषदेचे अधिकारी, गडाचे विश्वस्त, उपसरपंच संदीप बेनके, प्रदीप निकम आदी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यातच भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, स्वच्छ्ता आदींचे नियोजन करावे. भाविकांना टप्प्या – टप्प्याने दर्शनासाठी सोडावे. मंदिर परिसरात आगप्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सेवा तसेच इतर पायाभूत सुविधांची योग्य व नियोजनबद्ध व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलीस बंदोबस्त ठेवावा, गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच, यात्रेदरम्यान अनावश्यक गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन सर्व व्यवस्था सुरळीतपणे पार पाडाव्यात. त्यासाठी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कश्मिरा संखे यांची इन्सिडंट कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

तहसीलदार श्री. वारुळे यांनी यात्रेसाठी केलेल्या तयारीची माहिती दिली. दरम्यान, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ही गड परिसरास भेट देऊन पोलिस बंदोबस्ताचा सविस्तर आढावा घेतला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790