नाशिक। दि. १७ मार्च २०२६: येवला- मनमाड- मालेगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी तसेच नागरिक, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी (गवंडगाव टोलनाका) येवला- मनमाड- मालेगाव (मनमाड चौफुली) या मार्गावर होणारी अवजड वाहतूक २४ मार्च २०२६ पासून रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. यावेळेव्यतिरिक्त या मार्गावरून होणारी अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निर्गमित केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल जनहित याचिका ४६/२०२३ मधील आदेशान्वये छत्रपती संभाजीनगरकडून धुळ्याकडे औट्रम घाटातून कन्नड मार्गे जाणारी अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ही वाहतूक छत्रपती संभाजीनगर येथून दौलताबाद टी पॉइंटकडून देवगाव रंगारी- शिऊर- पिंपरखेड ते मालेगाव किंवा दौलताबाद टी पॉइंटकडून देवगाव रंगारी- शिऊर- पिंपरखेड- न्यायडोंगरी- चाळीसगाव मार्गे राज्य मार्ग क्रमांक २६ वरून वळविण्याचे निर्देश दिले दिले आहेत.
तसेच अपर जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी शिऊर बंगला ते नांदगाव मार्गे अवजड वाहतूक वळविण्याचे निर्देश दिले आहेत. वरील आदेश व निर्देशांमुळे छत्रपती संभाजीनगरकडून धुळ्याकडे जाणारे वरील नमूद दोन्ही पर्यायी रस्ते अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकडून धुळ्याकडे होणारी सर्व अवजड वाहतूक वैजापूर- येवला- मनमाड- धुळे या मार्गे होत आहे. त्यामुळे येवला- मनमाड रस्त्यावरील अवजड वाहनांची वर्दळ झाल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. तसेच या दोन्ही मार्गावर एकेरी वाहतूक करता येणे तांत्रिक कारणास्तव शक्य नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी वरील आदेश दिले आहेत.
रुग्णवाहिका, पोलिस वाहने, अग्निशमन वाहने, राज्य शासनाच्या प्रवासी बस, आपत्कालिन परिस्थितीत मदत करणारी आरोग्य विभाग, शासनाची वाहने, क्रेन, नादुरुस्त वाहनांना घेऊन जाणारी क्रेनसारख्या वाहनांना या अधिसूचनेतील प्रतिबंधित कालावधीतून सूट देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोटार वाहन अधिनियमान्वये दिशादर्शक व वाहतूक चिन्हे प्रदर्शित करण्याबाबत कार्यवाही करावी, असेही म्हटले आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता, मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी नमूद केले आहे.
![]()

