नाशिक: मोक्का प्रकरणातील आरोपी पुन्हा जेरबंद; मैत्रिणीच्या घरातून दागिन्यांची चोरी

नाशिक। दि. ४ मार्च २०२६: मोक्का कायद्यान्वये शिक्षा भोगून नुकताच जामिनावर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराने मैत्रिणीच्या घरातून दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने सापळा रचून संशयिताला अटक केली असून त्याला पुढील कारवाईसाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

श्रीजय संजय खाडे (रा. जुने नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलीस अंमलदार विलास चारोस्कर व गोरक्ष साबळे यांना मिळालेल्या माहितीनुसार, उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यात खाडे याचा सहभाग असल्याची माहिती मिळाली होती. तो आडगाव येथील श्री समर्थनगर परिसरात येणार असल्याची खबर मिळताच पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

पोलिसांनी चौकशी केली असता, खाडे हा नुकताच मोक्का प्रकरणात शिक्षा भोगून जामिनावर बाहेर आल्याचे समोर आले. उपनगर परिसरात राहणाऱ्या आपल्या मैत्रिणीच्या घरी तो भेटण्यासाठी गेला असता, घरातील कपाटात ठेवलेले दागिने त्याने चोरल्याची कबुली दिली.

नऊ गंभीर गुन्ह्यांची नोंद:
खाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यांत नऊ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. २०२३ मध्ये अंबड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. सुमारे दोन वर्षे तो कारागृहात होता. दोन महिन्यांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790