नाशिक: पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच लाच स्वीकारताना हवालदार मुंबई ACBच्या जाळ्यात

नाशिक। दि. ५ फेब्रुवारी २०२६: अपघाताच्या गुन्ह्यात समेट घडवून आणून देण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यातील हवालदार संशयित संदीप दगू गांगुर्डे (वय ४३, बक्कल क्रमांक १८७) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) मुंबई पथकाने रंगेहात अटक केली. बुधवारी (दि. ४) मध्यरात्री पंचवटी पोलीस ठाण्याच्या गेटजवळ पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताच ही कारवाई करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. १० जून) वीजपुरवठा बंद राहणार…

पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका अपघाताच्या गुन्ह्यात तक्रारदार व आरोपी यांच्यात तडजोड घडवून आणण्यासाठी गांगुर्डे यांनी ३१ जानेवारी रोजी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. नंतर तडजोडीनंतर पाच हजार रुपये स्वीकारण्यावर सहमती झाली. याबाबत तक्रारदाराने थेट एसीबीच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तक्रारीची शहानिशा करून कारवाईचे आदेश वरळी, मुंबई येथील एसीबी कार्यालयाला देण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण वृत्तीचा स्वीकार करावा- पोलिस महासंचालक सदानंद दाते

त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याबाहेर सापळा रचण्यात आला. मध्यरात्री लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर संशय आल्याने गांगुर्डे तातडीने पोलीस ठाण्याच्या प्रसाधनगृहात गेले. मात्र एसीबी पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

चौकशीत सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सापळा कारवाईचे सहायक पोलीस आयुक्त यांनी विश्वासात घेत विचारपूस केली असता, लाचेची रक्कम आपल्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये लपविल्याची त्यांनी कबुली दिली. अंगझडतीत मोबाइल, ७९५ रुपये रोकड, पांढऱ्या धातूची साखळी तसेच गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. दिवसभर त्यांच्या निवासस्थानी झडती सुरू होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तुमच्या दुकानात बालकामगार काम करतोय? होऊ शकते कठोर कारवाई !

ही कारवाई बृहन्मुंबई एसीबीचे पोलीस निरीक्षक सागर आरगडे व त्यांच्या पथकाने केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाणे येथे गांगुर्डे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्र. ४६/२६; भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ तसेच बीएनएस कलम २३८, ६२).

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790