नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धेचे दागिने लुटले

नाशिक। दि. ४ फेब्रुवारी २०२६: इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धेची फसवणूक करत दागिने लांबविण्याची घटना पुन्हा घडली आहे. “तिकडे पोलिस निरीक्षक उभे आहेत, चला तिकडे. पुढे एका महिलेवर चाकूहल्ला झाला आहे; एवढे सोने अंगावर घालून जाऊ नका,” असे भीतीदायक कारण सांगत तोतया पोलिसांनी वृद्धेला गंडा घातला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

फिर्यादी श्रीमती वारे (वय ७५) सोमवारी (दि. २) दुपारी सव्वा एकच्या सुमारास आपल्या घरातून समर्थनगर येथील रामेश्वरम महादेव मंदिराकडे पायी जात होत्या. मंदिराजवळ पोहोचताच त्यांच्या पाठीमागून एक अनोळखी इसम आला. त्याने आपण पोलिस असल्याचे सांगून त्यांना बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या इसमाकडे नेले. त्या दोघांनी मिळून पुढे चाकूहल्ला झाल्याची खोटी माहिती देत भीती निर्माण केली आणि दागिने काढून ठेवण्यास सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंकच्या 'या' भागांतील वाहतूक मार्गात तात्पुरता बदल

वृद्धेने दागिने स्वतः काढता येत नसल्याचे सांगितल्यानंतर, संबंधित इसमाने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व डाव्या हातातील सोन्याची अंगठी काढून देण्याचा बनाव केला. दागिने पांढऱ्या कागदात गुंडाळून देत असल्याचे भासवून तो कागद त्यांच्या हातात दिला. वारे यांनी तो कागद पर्समध्ये ठेवला. काही वेळातच तोतया पोलिसांनी घटनास्थळावरून पोबारा केला.

मंदिरात पोहोचल्यानंतर कागद उघडून पाहिल्यावर त्यात मातीचा खडा आढळून आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणात १३ ग्रॅम वजनाची काळ्या मण्यांच्या पेंडलसह सोनसाखळी (अंदाजे ७८ हजार रुपये) आणि २ ग्रॅम वजनाची नक्षीदार सोन्याची अंगठी (अंदाजे १२ हजार रुपये), असा एकूण सुमारे ९० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचे नमूद आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

या घटनेप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७/२०२६ असा आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790