नाशिक। दि. १ फेब्रुवारी २०२६: जानेवारीच्या अखेरीस नाशिककरांना जाणवलेली तीव्र थंडी सध्या ढगाळ हवामानामुळे कमी झाली आहे. शुक्रवारी (दि. ३०) शहरावर दाट ढग पसरल्याने किमान तापमानात गुरुवारच्या (दि. २९) तुलनेत सुमारे ३ अंश सेल्सिअसची वाढ नोंदवली गेली असून तापमान १६.६ अंशांपर्यंत पोहोचले होते. मात्र, पुढील दोन दिवसांत पुन्हा गारवा वाढण्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने व्यक्त केला आहे.
अरबी समुद्राकडून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे शुक्रवारी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असला तरी प्रत्यक्षात पावसाने हजेरी लावली नाही.
दरम्यान, उत्तर भारतात सक्रिय झालेल्या पश्चिमी चक्रवातामुळे हिमाचल प्रदेश व काश्मीरमध्ये हिमवृष्टी सुरू आहे. या प्रणालीचा प्रभाव आणि अरबी समुद्रातील वाढलेली आर्द्रता यांमुळे खालच्या वातावरणीय थरात चक्रीय स्थिती निर्माण झाली असून त्यातून ढगाळ वातावरण तयार झाले आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
![]()


