नाशिक। दि. २४ जानेवारी २०२५: शेअर बाजारातील ट्रेडिंगमधून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अज्ञात सायबर भामट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ९९ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार घरी असताना एका अनोळखी व्हॉट्सअॅप क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. संबंधित व्यक्तीने चॅटिंगच्या माध्यमातून विश्वास संपादन करत बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे भासविले. या आमिषाला बळी पडत तक्रारदाराने त्याच्या सांगण्यानुसार विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी एकूण ९९ लाख ५० हजार ५१० रुपये ट्रान्स्फर केले.
मात्र, गुंतवणुकीनंतर अपेक्षित नफा मिळाला नाहीच, उलट मूळ रक्कमही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. हा प्रकार ८ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सायबर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पिसे पुढील तपास करीत आहेत.
![]()


