नाशिक । दि. २४ जानेवारी २०२६: “मुलीला फोन का करतो?” या क्षुल्लक कारणावरून युवकावर अमानुष हल्ला करून त्याचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने महिलेसह चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नीलेश दिनकर ढोके, प्रसाद शिरीष मुळे, सतीश अप्पा आहिरे आणि पल्लवी नीलेश ढोके अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी (दि. २३) जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी हा निकाल दिला.
अभियोग कक्षाच्या माहितीनुसार, ८ एप्रिल २०२३ रोजी सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात ही घटना घडली. आरोपींनी नितीन गणपत जाधव याला “मुलीला फोन का करतो” या कारणावरून लोखंडी रॉडने डोक्यात जबर मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत जाधव यांना आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनिरीक्षक सुनील बीडगर व रवींद्र पानसरे यांनी तपास करून आरोपींविरोधात दोषारोपपत्र सादर केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान साक्षीदार, पंच आणि तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
![]()


