नाशिक: कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोन फरार आरोपींना अटक !

नाशिक। दि. २३ जानेवारी २०२६: नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची महागडा मोबाईल खरेदी करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हेशाखा युनिट–२ ने दोन फरार आरोपींना सिडको परिसरातून अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२५ मध्ये फिर्यादी यांना नवीन व्यवसायासाठी भांडवलाची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी पाथर्डीफाटा येथील रिलायन्स मॉलमध्ये सचिन खिल्लारे व गणेश जगदाळे यांच्याकडे कर्जाबाबत चौकशी केली. त्या वेळी आरोपींनी कंझ्युमर लोनसाठी आधी मोबाईल खरेदी करावा लागेल, असे सांगितले. यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी रिलायन्स मॉलमधून अॅपल कंपनीचा आयफोन १६ हा मोबाईल ७१ हजार रुपयांना खरेदी केला.

🔎 हे वाचलं का?:  सलग चार दिवस बँका बंद राहणार का ? जाणून घ्या सविस्तर…

मोबाईल खरेदीनंतर आरोपी सचिन खिल्लारे याने तो मोबाईल स्वतःकडे ठेवून सायंकाळपर्यंत पैसे मिळतील, असे आश्वासन दिले. मात्र, ठरलेल्या वेळेत पैसे न मिळाल्याने फिर्यादी यांनी वारंवार संपर्क साधला असता, आरोपींनी टाळाटाळ केली. अखेर मोबाईलचे पैसेही परत न दिल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री फिर्यादी यांना झाली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४३७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कोयता घेऊन दहशत माजवणारा तरुण गुन्हे शाखेच्या ताब्यात !

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सचिन खिल्लारे व गणेश जगदाळे हे फरार होते. त्यांचा शोध घेत असताना गुन्हेशाखा युनिट–२ मधील पोलीस अंमलदारांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन्ही आरोपी उत्तमनगर, सिडको येथील अतुल डेअरी परिसरात वावरत आहेत. ही माहिती वरिष्ठांना कळवून योग्य सूचना घेण्यात आल्या.

त्यानंतर पथकाने सापळा रचून संबंधित ठिकाणाहून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी आपली नावे सतिश उर्फ सचिन शेषराव खिल्लारे (वय २१, रा. सिहस्थनगर, सिडको) आणि गणेश युवराज जगदाळे (वय २३, रा. उत्तमनगर, सिडको) अशी सांगितली. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक एरोबॅटिक शो 2026:नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद... व्हिडिओ बघा…

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ चे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर (प्रभारी अधिकारी), सहायक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, हवालदार मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, अंमलदार प्रविण वानखेडे, सुनिल खैरनार यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790