
नाशिक। दि. २३ जानेवारी २०२६: बेथेलनगर, शरणपूर परिसरात हातात धारदार कोयता घेऊन नागरिकांना धमकावत दहशत पसरवणाऱ्या तरुणाला गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. २२) सायंकाळी करण्यात आली.
गुन्हेशाखा युनिट-१चे हवालदार प्रशांत मरकड व पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संबंधित इसम परिसरात कोयता हातात घेऊन “मी या परिसरातील भाई आहे” अशी आरोळी ठोकत नागरिकांना धमकावत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रविण वाघमारे, प्रदीप म्हसदे, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, संदीप भांड, मुक्तार शेख, अनुजा येलवे व नाझीमखान पठाण यांच्या पथकाने बेथेलनगर, शरणपूर परिसरात सापळा रचला.
पोलिस पथकाने संशयिताला घेराव घालून त्याच्या हातातील धारदार कोयत्यासह ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव आदित्य नामदेव लष्करे (वय २२, रा. हनुमानवाडी, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक) असल्याचे सांगितले. अंगझडतीदरम्यान एक धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीचा गुन्हेगारी अभिलेख तपासला असता, त्याच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपास सुरू असून संबंधित प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
![]()


