नाशिक एरोबॅटिक शो 2026:नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद… व्हिडिओ बघा…

नाशिक। दि. २२ जानेवारी २०२६: ‘नमस्कार, नाशिककरांनो खूप- खूप आभार’. हे शब्द आहेत, भारतीय वायू दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीममधील ग्रुप कॅप्टन अजय दशरथी यांचे. आणि त्यांनी हा संवाद साधला होता गंगापूर धरणावर हवाई प्रात्यक्षिक सादर करताना.

भारतीय वायू दल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा विकास आराखड्यातील नाशिक फेस्टिव्हल अंतर्गत आजपासून दोन दिवस एरोबॅटिक शो आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज सकाळी सुर्यकिरण ॲरोबॅटिक टीमने हवाई प्रात्यक्षिक सादर केली. त्यावेळी ते बोलत होते.

जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना या शोचा आनंद घेण्याचे आवाहन केले. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारचा उपक्रम होत आहे. हा क्षण सैन्य दलाच्या कामगिरीला अभिवादन करण्याचा असल्याचे त्यांनी सांगितले. स्क्वॉड्रन लीडर गौरव पटेल, संजीव सिंह, ललित वर्मा, संजीव दयाळ, अजय दशरथी, श्री. विष्णू यांनी या विमानांचे सारथ्य केले, तर फ्लाइट लेफ्ट. कवल संधू यांनी या विमानांची तांत्रिक माहिती देतानाच या हवाई प्रात्यक्षिकांचे धावते वर्णन केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७: शहर सुशोभीकरणासाठी तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना

या शोची गेल्या दोन आठवड्यांपासून तयारी सुरू होती. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहनतळ, बैठक व्यवस्था, रस्ते आदी कामे पूर्ण केली, तर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने पाणी व स्वच्छतेची जबाबदारी घेतली होती. पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले. त्यांच्या मदतीसाठी माजी सैनिक, राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी होते. तर विद्युत विभागाने नागरीकांच्या बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्क्रीनची व्यवस्था केली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'सूर्यकिरण एअर शो'मुळे २२ व २३ जानेवारीला 'या' वाहतूक मार्गात बदल

सूर्यकिरणांच्या तेजाने झळाळला आसमंत:
भारतीय वायू दलाच्या विमानांनी केलेली चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि हजारो नाशिककरांनी ‘भारत माता की जय’, वंदे मातरमसह विविध देशक्तीपर गीतांच्या जयघोषात त्याला दिलेल्या प्रतिसादाने नाशिकचा आसमंत निनादला. सूर्यकिरण विमानांच्या या कसरतीनी नाशिककरांच्या मनातील देशभक्तीच्या भावनांना व्यापक रूप दिले आणि देशप्रेमाचा हा जनसागर गंगापूर धरण क्षेत्रात एकवटला. सूर्यकिरण टीमच्या हवाई प्रात्यक्षिकांना नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला. पोलीस बॅण्डवर वाजविण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतांनी अवघा गंगापूर धरण परिसर दुमदुमला होता.

🔎 हे वाचलं का?:  लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा महत्वाचा निर्णय, आदिती तटकरे यांची पोस्ट नेमकी काय?

शुक्रवारचा कार्यक्रम सुरु होणार अकरा वाजता:
यापूर्वी सुर्यकिरण एरो शो ची वेळ सकाळी 10 वाजेची होती. तथापि, धरण परिसरातील वातावरणामुळे शुक्रवार दि. 23 जानेवारीचा कार्यक्रम सकाळी 10 ऐवजी 11 वाजता सुरु होणार आहे. तरी नागरीकांनी सकाळी 10.45 वाजेपूर्वी आपल्या जागी आसनस्थ व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790