नाशिक। दि. २१ जानेवारी २०२६: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता १० वी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंगळवारपासून (दि. २०) उपलब्ध करून दिली आहेत. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमधून २,०७,१२० विद्यार्थ्यांचे अर्ज आतापर्यंत आले आहेत.
राज्यातील सर्व विभागीय मंडळांतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboar d.in वरील अॅडमिट कार्ड या लिंकद्वारे डाउनलोड करता येणार आहेत. सर्व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे
ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करून त्याची प्रिंट विद्यार्थ्यांना द्यावी. प्रवेशपत्र छापताना विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश मंडळाने दिले आहेत. प्रवेशपत्रावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असणे बंधनकारक राहील.
शिक्का व ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जाना पेड स्टेटस प्राप्त झाला आहे, त्यांचीच प्रवेशपत्रे उपलब्ध होतील. उशिरा शुल्क भरलेल्या किंवा अतिरिक्त आसन क्रमांक दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे स्वतंत्र पर्यायाद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. प्रवेशपत्र हरवल्यास संबंधित शाळांनी पुन्हा प्रिंट काढून लाल शाईने ‘द्वितीय प्रत’ असा शेरा देऊन प्रवेशपत्र द्यावे, असेही मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी कळविले आहे.
![]()


