नाशिक। दि. २० जानेवारी २०२७: पाकिस्तानकडून हिमालयाकडे सलग तीन पश्चिमी चक्रावात सक्रिय झाल्याने आगामी सात दिवस हिमालयीन भागात हिमवर्षावाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विशेषतः २२ व २३ जानेवारीदरम्यान जम्मू आणि काश्मीर तसेच हिमाचल प्रदेश येथे जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.
या हवामान बदलाचा परिणाम महाराष्ट्रावरही जाणवू लागला असून, उत्तरेकडून ताशी ५ ते ६ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गारठा वाढला आहे. सोमवारी नाशिक येथे किमान तापमानात २ अंश सेल्सिअसची घसरण होऊन ते ११.४ अंशांवर नोंदले गेले. तर मालेगाव परिसरात थंडीच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली.
उत्तरेकडील लेह, लडाख, कारगिल, द्रास तसेच हिमालयातील काही भागांत जोरदार हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. या भागांतून वाहणाऱ्या अत्यंत थंड वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात आणखी घट होऊन थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, पहाटे व सकाळच्या सुमारास दाट धुके पडण्याची शक्यता असून, त्यामुळे दृश्यमानता सुमारे ८० मीटरपर्यंत मर्यादित राहू शकते, असा अंदाज इगतपुरी हवामान केंद्र यांनी व्यक्त केला आहे.
उत्तर महाराष्ट्रात २७ जानेवारीपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार असून, विशेषतः ग्रामीण भागात पहाटे दाट धुक्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
![]()


