नाशिक | दि. १८ जानेवारी २०२६: मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील इंदिरानगर बोगद्याचे रुंदीकरण आणि ‘ग्रेड सेपरेटर फ्लायओव्हर’चे काम अंतिम टप्प्यात आले असून, गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेला हा बोगदा येत्या २६ जानेवारीपासून वाहतुकीस सुरू होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कामे नियोजित वेळेआधी पूर्ण करण्यावर भर दिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रकल्पांतर्गत जुन्या बोगद्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी सुमारे ८ मीटरची वाढ करून नवीन बोगद्याचे बांधकाम करण्यात येत आहे. नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या कामांसाठी जुलै २०२६ अखेरपर्यंत बोगदा बंद ठेवण्याची अधिसूचना होती. मात्र, कामांना गती देत एका बोगद्यातून वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बोगदा सुरू झाल्यानंतर नाशिक रोड, डीजेपीनगर, वडाळागाव, पाथर्डी फाटा, इंदिरानगर आणि वडाळा परिसरातील सुमारे सात लाखांहून अधिक नागरिकांना थेट लाभ होणार आहे. उंटवाडी, आर.डी. सर्कल, गोविंदनगर, भुजबळ फार्म, पांगरेनगर, बडदेनगर तसेच मुंबई नाका परिसराकडे जाणाऱ्या वाहनचालकांना केवळ २० मीटरच्या अंतरासाठी दीड किलोमीटरचा वळसा घ्यावा लागत होता; तो त्रास आता टळणार आहे.
बोगदा बंद असल्याने वाहनधारकांना लेखानगर–गोविंदनगर मार्गे किंवा सर्व्हिस रोडवरून यू-टर्न घेत लांब फेरा मारावा लागत होता. परिणामी वेळ आणि इंधनाचा अपव्यय वाढला होता. बोगदा सुरू झाल्यानंतर ही कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, मागील दीड वर्षांपासून कामांमुळे बंद असलेला राणेनगर बोगदा नुकताच वाहतुकीस खुला करण्यात आल्याने सिडको परिसरातील वाहतूकही काही प्रमाणात सुलभ झाली आहे.
इंदिरानगर बोगदा परिसरातील कामांना वेग देण्यात आला असून, “तीन ते चार महिन्यांत पूर्ण होणारे काम दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. येत्या २६ जानेवारीपर्यंत बोगदा वाहतुकीस सुरू करण्याचे नियोजन आहे,” अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय अधिकारी शशांक आडके यांनी दिली.
![]()


