
नाशिक। दि. ९ जानेवारी २०२५: मोबाइल हरविला किंवा चोरीला गेला की तो कायमचा निघून जातो, हा सर्वसामान्यांमध्ये रुजलेला समज नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या ‘मोबाइल शोध विशेष पथका’ने गुरुवारी (दि. ८) ठोस कामगिरीतून खोडून काढला.

शहरातील १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गहाळ अथवा चोरीस गेलेले एकूण ५३५ महागडे अँड्रॉइड मोबाइल शोधून काढत सुमारे १ कोटी २ लाख रुपयांची मालमत्ता तक्रारदारांना सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आली. पत्नी, मुलगा किंवा वडिलांनी भेट म्हणून दिलेले मोबाइल हरवल्याने निराश झालेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये स्थापन करण्यात आलेल्या या विशेष पथकाकडे मोबाइल शोधाचा विशेष टास्क सोपविण्यात आला होता. गुरुवारी दुपारी पोलिस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात मनपा आयुक्त मनीषा खत्री, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, किशोर काळे, मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, मोबाइल शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सुधीर पाटील यांनी केले.
या मोहिमेत सहायक निरीक्षक जया तारडे, उपनिरीक्षक अफरोज शेख, पूनम नाईक, शरद पाटील आदी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. तांत्रिक विश्लेषण शाखेच्या सहकार्याने उपलब्ध डेटाचा अभ्यास करत मानवी कौशल्य आणि आधुनिक तांत्रिक पद्धतींचा प्रभावी वापर करून मोबाइलचा शोध घेण्यात आला. शोधण्यात आलेल्या मोबाइलची किंमत किमान १५ हजारांपासून ते कमाल १ लाख ७५ हजार रुपयांपर्यंत आहे.
कोणतीही वस्तू चोरीला गेली किंवा मोबाइलसारखी मौल्यवान वस्तू गहाळ झाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. पोलिसांकडून त्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने शोध घेतला जातो, असा विश्वास नागरिकांनी ठेवावा, असे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले. मोबाइल शोध विशेष पथकाने केलेली ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“मला माझ्या मुलाने अमेरिकेला जाण्यापूर्वी हा मोबाइल गिफ्ट दिला होता. दोन महिन्यांपूर्वी मोबाइल चोरीला गेला होता. पोलिसांनी मोबाइल शोधून दिल्याने आनंद आहे.”- सतीश हिरे, तक्रारदार
“नवीन वर्षाची भेट म्हणून मोठ्या आनंदाने मला माझ्या मुलाने मोबाइल भेट दिला होता. आज तो मोबाइल पुन्हा मिळाल्याने खूप आनंद झाला आहे”.- मीना देवरे, तक्रारदार
“माझ्या पत्नीकडून मला मोबाइल गिफ्ट मिळाले होते. मोबाइल हरविल्याचे आम्हा दोघांना खूप दुःख झाले होते. पोलिसांनी खूप कमी वेळेत मोबाइल पुन्हा परत शोधून दिला.”- गिरीश पाठक, तक्रारदार
![]()


