नाशिक: टेंट सिटी उभारणीबाबत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्रधिकरणाची भागधारकांसमवेत चर्चा

नाशिक। दि. ९ जानेवारी २०२६: आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या व्यापक तयारीचा भाग म्हणून नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या (एनटीकेएमए) वतीने टेंट सिटी सुविधा उभारणी व संचालनाबाबत भागधारकांसमवेत चर्चेचे आयोजन केले होते. या चर्चेच्या अध्यक्षस्थानी कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह होते.

यावेळी नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, एनटीकेएमए सहायक आयुक्त सौरीश सहाय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) नाशिकचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ. नंदकुमार राऊत, एनटीकेएमए तहसीलदार योगेश चंद्रे, मकरंद दिवाकर तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. नाशिक महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी कार्यालयात हे चर्चासत्र पार पडले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करा- पालक सचिव एकनाथ डवले

यादरम्यान, कुंभमेळ्याच्या कालावधीत उभारल्या जाणाऱ्या टेंट सिटींचे नियोजन, नियमन व संचालन याबाबत व्यापक पातळीवर चर्चा करण्यात आली. टेंट सिटी विकासासाठी प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली एकसंध व शिस्तबद्ध कार्यपद्धती राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. भाविकांच्या सुरक्षिततेसह दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक नागरी सुविधा, स्वच्छता, वाजवी दर, सुरक्षितता मानके तसेच कुंभमेळ्याच्या एकूण वाहतूक व गर्दी व्यवस्थापन आराखड्याशी टेंट सिटींचे समन्वयित नियोजन करण्यावर भर देण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  सलग चार दिवस बँका बंद राहणार का ? जाणून घ्या सविस्तर…

सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टेंट सिटी सुविधांमध्ये एकसमानता राखणे, भागधारकांची पारदर्शक पद्धतीने निवड प्रक्रिया राबविणे आणि अधिकृत टेंट सिटींबाबतची खात्रीशीर माहिती भाविकांपर्यंत अधिकृत माध्यमांतून पोहोचवणे, या मुद्द्यांवर विशेष चर्चा झाली. तसेच पार्किंग, अंतर्गत वाहतूक व्यवस्था आणि विविध यंत्रणांमधील समन्वय याबाबत संकल्पनात्मक स्तरावर विचारमंथन करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  'एअर शो'ला जाण्याआधी ही बातमी नक्की वाचा… गंगापूररोडवरील वाहतूक मार्गात आज (दि.२३) बदल !

नियंत्रित व अधिकृत टेंट सिटी सेवांच्या माध्यमातून भाविकांचा एकूण अनुभव अधिक सुलभ व सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ही चर्चा उपयुक्त ठरेल, असे एनटीकेएमएच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. शिवाय, भागधारकांकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा विचार करून टेंट सिटी संदर्भातील धोरणे व कार्यपद्धती अंतिम करण्यात येतील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790