NC

नाशिक: पतंगोत्सव साजरा करताना विद्युत सुरक्षेची काळजी घ्या; महावितरणचे नागरिकांना आवाहन

नाशिक। दि. ७ जानेवारी २०२६: मकर संक्रांतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पतंग उडवताना विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. पतंग उडवताना उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, फिडर तसेच विद्युत यंत्रणांपासून सुरक्षित अंतर ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

सणासुदीच्या काळात शहरासह ग्रामीण भागातही रंगीबिरंगी पतंग उडवण्याचा उत्साह शिगेला पोहोचतो. मात्र या उत्साहात कोणताही अनुचित प्रकार किंवा अपघात घडू नये, यासाठी विद्युत सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. विशेषतः नायलॉन मांजाचा वापर टाळावा, कारण अशा प्रकारच्या मांजावर कायदेशीर बंदी आहे. धातुमिश्रित कोटिंगमुळे नायलॉन मांज विद्युत प्रवाह वाहक ठरू शकतो, ज्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

🔎 हे वाचलं का?:  छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे प्रती किलोवॅट १५ हजाराची बचत, वीज ग्राहकांचा फायदा

शहरी व ग्रामीण भागात वीज वितरणासाठी उच्च व लघुदाबाच्या वाहिन्यांचे विस्तृत जाळे आहे. अनेकदा उडवलेले पतंग या वाहिन्यांवर किंवा वीजखांबांवर अडकतात. अशा प्रसंगी काठी, लोखंडी सळई, दगड किंवा अन्य कोणत्याही साधनाच्या सहाय्याने अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये, असे महावितरणने स्पष्टपणे सूचित केले आहे. विजेच्या प्रवाहात असलेल्या तारांचा स्पर्श झाल्यास जीवघेणा धोका निर्माण होऊ शकतो.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आधारभूत दरानुसार होणार चना खरेदी; शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत नोदंणीची संधी

काही घटनांमध्ये अडकलेल्या पतंगाचा मांजा जमिनीवर लोंबकळत राहतो. असा मांजा ओढल्यास तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असते. यामुळे प्राणांतिक अपघात होण्यासोबतच परिसरातील वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. नायलॉन मांजा वीजवाहिन्यांना अडकल्यास विद्युत यंत्रणेत बिघाड होऊन नागरिकांना वीजखंडिततेचा सामना करावा लागू शकतो.

नागरिकांनी तसेच लहान मुलांनी वीजवाहिन्या व विद्युत यंत्रणांपासून दूर, सुरक्षित व मोकळ्या जागीच पतंगोत्सव साजरा करावा. पालकांनी आपल्या पाल्यांवर विशेष लक्ष ठेवून त्यांना सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगावे आणि आवश्यक असल्यास त्यांच्यासोबत उपस्थित राहावे, असेही महावितरणने नमूद केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहराच्या कमाल तापमानात वाढ… जाणून घ्या सविस्तर…

वादळी वारे किंवा पावसाच्या वेळी वीजवाहिन्यांमध्ये अडकलेले पतंग व धागे वीजपुरवठा खंडित होण्यास कारणीभूत ठरतात, ज्यामुळे ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्कता आणि काळजी घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत किंवा तातडीच्या मदतीसाठी नागरिकांनी जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा महावितरणच्या २४x७ कार्यरत असलेल्या कॉल सेंटर क्रमांकांवर — १९१२, १८००-२१२-३४३५, १८००-२३३-३४३५ — संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790