नाशिक-अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; 19,142 कोटी रुपयांचा खर्च !

नवी दिल्ली/नाशिक। दि. १ जानेवारी २०२६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज महाराष्ट्रात 374 किमी. लांबीच्या 6-पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर-अक्कलकोट मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे.

बांधा वापरा हस्तांतरित करा (टोल) या तत्त्वावर राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 19,142 कोटी रुपये आहे. नकाशात दर्शविल्याप्रमाणे, हा प्रकल्प नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या प्रादेशिक शहरांना जोडत पुढे कुर्नुलला संपर्कव्यवस्था प्रदान करेल. ही पायाभूत सुविधा पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद् आराखड्याच्या तत्त्वांतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यासाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून ज्येष्ठ नागरिकाची ९९.५० लाखांची फसवणूक

नाशिक ते अक्कलकोट दरम्यानची ही ग्रीनफिल्ड मार्गिका वाढवण बंदर इंटरचेंजजवळ दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेला, नाशिकमध्ये राष्ट्रीय महामार्ग -60 (आडेगाव) च्या जंक्शनवर आग्रा-मुंबई कॉरिडॉरला आणि पांगरी (नाशिक जवळ) येथे समृद्धी महामार्गाला जोडण्याचे प्रस्तावित आहे. ही प्रस्तावित मार्गिका पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत थेट संपर्कव्यवस्था उपलब्ध करेल. चेन्नई बंदराच्या बाजूने, तिरुवल्लूर, रेणिगुंटा, कडप्पा आणि कुर्नूलमार्गे चेन्नई ते हसापूर (महाराष्ट्र सीमा) पर्यंत (700 किमी लांब) 4-पदरी मार्गिकेचे काम आधीच प्रगतीपथावर आहे.

🔎 हे वाचलं का?:  'एअर शो'ला जाण्याआधी ही बातमी नक्की वाचा… गंगापूररोडवरील वाहतूक मार्गात आज (दि.२३) बदल !

प्रवासाची कार्यक्षमता सुधारणे हा या प्रस्तावित ऍक्सेस-कंट्रोल्ड सहा-पदरी ग्रीनफिल्ड प्रकल्पाचा मुख्य उद्देश असून, यामुळे प्रवासाचा वेळ 17 तास आणि प्रवासाचे अंतर 201 किमी ने कमी होण्याची अपेक्षा आहे. नाशिक-अक्कलकोट (सोलापूर) संपर्कव्यवस्थेमुळे कोप्पर्थी आणि ओरवाकल या प्रमुख नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NICDC) नोड्सवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या मालाची लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारेल.

नाशिक-तळेगाव दिघे हा भाग पुणे-नाशिक एक्सप्रेसवेच्या विकासाची गरज देखील पूर्ण करतो, एनआयसीडीसी ने महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे हाती घेतल्या जाणाऱ्या प्रस्तावित नवीन एक्सप्रेसवेचा भाग म्हणून त्याची ओळख केली आहे. हा प्रकल्प सुधारित सुरक्षा आणि विनाखंड वाहतुकीसाठी रचना केलेली द्रुत-गती मार्गिका उपलब्ध करतो, ज्यामुळे प्रवासाचा वेळ, वाहतूक कोंडी आणि परिचालन खर्च कमी होईल. महत्त्वाचे म्हणजे, हा प्रकल्प या क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करेल आणि नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सर्वांगीण आर्थिक विकासात मोलाचे योगदान देईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: णमोकार तीर्थ महोत्सवासाठी प्रस्तावित कामे 30 जानेवारीपर्यंत पूर्ण करावीत

अंतर 31 तासावरुन 17 तासांवर:
6-पदरी ॲक्सेस-कंट्रोल्ड ग्रीनफिल्ड कॉरिडॉर ‘क्लोज टोलिंग’ सुविधेसह असेल, ज्यावर सरासरी ताशी 60 किमी आणि ताशी 100 किमी डिझाइन स्पीडची परवानगी असेल. त्यामुळे प्रवासाचा एकूण वेळ अंदाजे 17 तासांपर्यंत कमी होईल (31 तासांवरून 45% ची घट), तसेच प्रवासी आणि मालवाहू दोन्ही वाहनांसाठी अधिक सुरक्षित, वेगवान आणि विनाखंड संपर्कव्यवस्था उपलब्ध होईल.

या प्रकल्पामुळे सुमारे 251.06 लाख मनुष्य-दिवस प्रत्यक्ष रोजगार आणि 313.83 लाख मनुष्य-दिवसांचा अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. या प्रस्तावित मार्गिकेच्या आसपासच्या परिसरात आर्थिक घडामोडी वाढल्यामुळे अतिरिक्त रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790