
नाशिक। दि. ०१ जानेवारी २०२६: नाशिक शहरात निर्मिती, विक्री व वापरास बंदी असलेल्या नायलॉन मांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तरुणाला गुन्हेशाखा युनिट–२च्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत सुमारे १ लाख १ हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
गुन्हेशाखा युनिट–२चे पोलीस अधिकारी व अंमलदार नायलॉन मांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांची माहिती संकलित करत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण व सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गोपनीय माहिती मिळाली. मुंबईनाका येथून भारतनगर झोपडपट्टीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर संशयित फारूक मुलाणी हा प्लास्टिकच्या गोणीत बंदी असलेला नायलॉन मांजा विक्रीसाठी बाळगत असल्याची ही माहिती होती.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचत भारतनगर झोपडपट्टीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर कारवाई केली. यावेळी संशयित फारूक जाफर मुलाणी (वय २२, रा. मुलतानपुरा, जुने नाशिक, भद्रकाली) याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडून मोनो KTC कंपनीचे वेगवेगळ्या रंगांचे एकूण १०१ गट्टू (बॉबीन) नायलॉन मांजा असा सुमारे १,०१,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून नायलॉन मांजाच्या साठवणूक व विक्री साखळीचा तपास पोलीस करत आहेत.
![]()


