नाशिक: आपत्ती व्यवस्थापनात सर्व यंत्रणांचा एकात्मिक दृष्टीकोन महत्वाचा- आयुक्त शेखर सिंह

नाशिक। दि. ३१ डिसेंबर २०२५: जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सूत्रबद्ध नियोजन सुरू आहे. यात शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक या सर्वांचा एकात्मिक दृष्टकोन महत्वाचा असल्याचे कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी कार्यशाळेत मागदर्शन करताना सांगितले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर विकास प्राधिकरण नाशिक मार्फत नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या अनुषंगाने तात्याश्री लॉन्समधील आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. आयुक्त श्री. सिह म्हणाले की, नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा स्वच्छ, हरित, सुंदर व सुरिक्षत करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनास प्राधान्य देवून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ‘आपत्ती’ म्हणजे कोणत्याही क्षेत्रात घडणारी मोठ्या प्रमाणावरील दुर्घटना, अपघात, आपत्तीजन्य घटना किंवा गंभीर प्रसंग. ही घटना नैसर्गिक कारणांमुळे किंवा मानवनिर्मित कारणांमुळे, तसेच अपघात किंवा निष्काळजीपणामुळे उद्भवू शकते. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने आतापासूनच संभाव्य आपत्तीच्या दृष्टीने खबरदारी घेणे आवश्यक आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: युवकाच्या खूनप्रकरणी महिलेसह चौघांना जन्मठेप !

या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रत्येक विभागाची आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने करावयाची मानसिक तयारी, नियोजन व येणारे दीड वर्ष आपत्ती निवारणासाठीचा नियमित सराव यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. यामुळे प्रत्येक विभागाला आपली जबाबदारी समजणे व सूक्ष्म नियोजन करणे सुलभ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा तयारीच्या अनुषंगाने लागणारे आवश्यक मनुष्यबळासाठी इतर जिल्ह्यातील अधिकारी यांचे आतापासून सेवावर्ग आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत. जेणेकरून नियुक्त अधिकाऱ्यांना त्यांची सेवा दिलेल्या विभागाबाबत माहिती घेवून आपत्ती व्यवस्थापनासाठी बारकाईने अभ्यास करून योग्य नियोजन करता येईल. लवकरच प्रत्येक विभागासाठी चर्चा अधारित प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.

नाशिक शहर व त्र्यंबकेश्वर येथील आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था स्वतंत्रपणे कार्यरत राहील हे लक्षात घेवून येथील पार्किंग, होल्डिंग, व्यासपीठ क्षेत्र, भाविक / अमृत स्नान मार्ग, घाट, साधूग्राम, रेल्वे स्थानक, बसस्थानक आदी बाबींवर प्राथमिक स्वरूपात नियोजन संबंधित प्रत्येक विभागाने करावयाचे आहे. त्यानंतर यास विभागीय एकात्मतेसह अंतिम नियोजन पुढील कार्यशाळांमध्ये निश्चित करता येईल, असे आयुक्त श्री सिंह यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून ज्येष्ठ नागरिकाची ९९.५० लाखांची फसवणूक

कार्यशाळेत मार्गदर्शक श्री. सुपणेकर यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन धोरण 2009, संभाव्य आपत्तीची परिस्थिती, आपत्ती व तिच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असण्याची अवस्था. आयआरएस (IRS) – तत्त्वे व वैशिष्ट्ये, घटना कृती आराखडा, घटना प्रतिसाद पथकाची जबाबदारी व उत्तरदायित्व, विभागांच्या भूमिका व जबाबदाऱ्यांशी संबंधित ठिकाणनिहाय धोके/अडथळे ओळखणे, प्रतिबंध व जोखीम कमी करण्याच्या उपाययोजनांची ओळख व संसाधन व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रत्येक विभागाने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विभागीय तांत्रिक प्रशिक्षण, सिंहस्थ कुंभमेळा संबंधित क्षेत्रीय प्रशिक्षण, याबाबतचा सराव, मॉक ड्रिल याबाबचे नियेाजन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निमंत्रित विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा आपत्ती संदर्भातील सिंडिकेट सरावासह आपत्ती संदर्भातील येणारे अडथळे व उपाययोजना याबाबत प्रश्नोत्तरे व संवादातून चर्चा झाली.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करा- पालक सचिव एकनाथ डवले

यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, महानगरपालिेकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, स्मिता झगडे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे, तहसीलदार मंदार दिवाकर, कार्यशाळा मार्गदर्शक कर्नल व्हि. एन. सुपणेकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व विभागप्रमुख व अधिकारी, रेल्वे‍ विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अग्नीशमन दलाचे अधिकारी कार्यशाळेस उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790