नाशिक। दि. ३० डिसेंबर २०२५: नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारी प्रक्रियेदरम्यान कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांनी एबी फॉर्म वाटपाच्या ठिकाणी एकत्र येत असंतोष व्यक्त केला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी हा प्रकार चुकीचा व अनुचित असल्याचे स्पष्ट करत सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
महाजन म्हणाले की, महापालिकेत एकूण १२२ जागा असून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सर्वांनाच तिकीट देणे शक्य नाही. “सुमारे ८० टक्के उमेदवारी जुने, अनुभवी कार्यकर्त्यांनाच देण्यात आली आहे. तरीही अनेकांना अपेक्षा असल्याने नाराजी निर्माण झाली. एबी फॉर्म वाटप सुरू असताना १०० ते १५० कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, हे निश्चितच अयोग्य आहे,” असे त्यांनी नमूद केले.
तिकीट वाटपात आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपांवर भाष्य करताना महाजन यांनी स्पष्ट केले की, अशा कोणत्याही व्यवहाराला पक्षात स्थान नाही. “कोणाकडे ठोस माहिती असल्यास ती द्यावी—एक कोटी असो वा पाच लाख. आरोप करणाऱ्यांची आणि तिकीट मिळालेल्यांचीही चौकशी केली जाईल. कुणी पैसे मागितले का, कुणी दिले का, याची सखोल तपासणी होईल,” असे त्यांनी सांगितले.
गेल्या आठ दिवसांपासून नाशिकमध्ये राहून सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेतल्याचे सांगत महाजन म्हणाले की, काही निर्णय ऐनवेळी बदलू शकतात; मात्र असंतोष व्यक्त करण्यासाठी हातघाईचा मार्ग अवलंबणे स्वीकारार्ह नाही. हा प्रकार प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तिकीट न मिळाल्याने आरोप होणे ही सामान्य बाब असल्याचे सांगत महाजन म्हणाले की, बाहेरून पक्षात आलेल्या काही नेत्यांनाही संधी द्यावी लागते. तरीही पक्षाने तीन वेळा सर्वेक्षण करून जिंकण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली आहे. “८० टक्के जुने आणि २० टक्के नवीन चेहरे अशी उमेदवारीची रचना आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
![]()


