नाशिक। दि. १८ नोव्हेंबर २०२५: नाशिक, प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दुचाकी वाहनांसाठी ‘MH-15-KP’ ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी 19 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 ते 2.30 या वेळेत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
दुचाकी वाहनांसाठी ‘MH-15-KP’ ही नवीन मालिकेच्या राखीव आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी शासन नियमानुसार ठराविक शुल्क विहित करण्यात आले आहे. याअनुषंगाने इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दि. 19 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या वेळेत कार्यालयात जमा करणे अनिवार्य असेल.
अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, वीज बील, घरपट्टी यापैकी एक तसेच अर्जदाराचे फोटो, आधारकार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड यापैकी एक साक्षांकित प्रत तसेच आधारलिंक मोबाईल क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी शुल्काची रक्कम कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा किंवा शेड्यूल्ड बँकेचा डिमांड ड्राफ्टद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक (R.T.O. NASHIK) यांच्या नावे काढावा. तसेच अर्जासोबत पॅनकार्डची साक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.
अर्जदराने एकदा राखून ठेवलेला पसंती क्रमांक दुसऱ्या व्यक्ती संस्थेच्या नावे हस्तांतरीत होणार नाही व कोणत्याही परिस्थतीत बदलून किंवा रद्द करता येणार नाही तसेच भरलेले शुल्क परत केले जाणार नाही. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अशा आकर्षक क्रमांकांची यादी कार्यालयातील सूचना फलकावर त्याच दिवशी प्रदर्शित करण्यात येईल. ज्या अर्जदाराचा आकर्षक क्रमांक लिलाव प्रक्रियेसाठी समाविष्ट असेल अशा अर्जदारांनी लिलावात भाग घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी 20 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत पंसतीच्या नोंदणी क्रमांसाठी विहित केलेल्या शुल्काच्या रकमेच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त कोणत्याही बोलीच्या रकमेचा एकच डिमांड ड्राफ्ट बंद पाकिटात सादर करावा.
ज्या अर्जदाराचा डिमांड ड्राफ्ट जास्त रकमेचा असेल अशा अर्जदारास पसंतीचा क्रमांक जारी करण्यात येईल. लिलावात एकापेक्षा जास्त डिमांड ड्राफ्ट सादर करणाऱ्या अर्जदाराचा अर्ज रद्द करण्यात येईल. याबाबतच्या अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे संपर्क साधावा, असेही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
![]()
