नाशिक | दि. ६ नोव्हेंबर २०२५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आणि बाधित शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (दि. ५) सायंकाळी पिंपळगाव बहुला ते त्र्यंबकेश्वर या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर मंत्री महाजन यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान न होता रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येईल.
त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक–त्र्यंबकेश्वर मार्गाचे विस्तारीकरण आवश्यक असल्याने एनएमआरडीएतर्फे पिंपळगाव बहुला ते त्र्यंबकेश्वर (एकूण १९ किमी) या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी ५० मीटर जागा संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, या कारवाईस स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने केवळ व्यावसायिक अतिक्रमण हटविण्यात आले.
शेतकऱ्यांच्या मागण्यांनुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ५० ऐवजी २५ मीटर जागा संपादित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर आणि स्थानिक शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापूर्वी, दि. २४ ऑक्टोबर रोजी आमदार अहिरे व खोसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांना स्थळ पाहणी करून योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.
पाहणीदरम्यान मंत्री महाजन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत शेतकऱ्यांची भूमिका व मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. “शासनाचा हेतू शेतकऱ्यांचे नुकसान न करता विकास काम पूर्ण करण्याचा आहे. रस्त्याच्या रुंदीबाबत सर्व संबंधित पक्षांच्या सहमतीने निर्णय घेतला जाईल,” असे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.
सध्या राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने काही निर्णय तत्काळ जाहीर करता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. “गरज भासल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेऊनच पुढील प्रशासकीय निर्णय घेण्यात येतील,” असेही महाजन यांनी सांगितले.
![]()


