नाशिक | दि. ५ नोव्हेंबर २०२४: नाशिककरांना आज सकाळी गारव्याची सुखद अनुभूती आली. शहरातील किमान तापमानात तब्बल ४ अंशांची घसरण नोंदली गेली असून, आजचे तापमान १८.० अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. दरम्यान, काल (दि. ४) कमाल तापमान २९.३ अंश सेल्सिअस इतके होते.
काल दुपारी शहरात उकाडा जाणवत होता, तर सायंकाळच्या सुमारास गंगापूर रोड, सातपूर, सिडको आणि त्र्यंबकरोड परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मागील दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी दिसत आहेत.
मंगळवारी सकाळी मात्र आकाश स्वच्छ व निरभ्र असल्याने तापमानात अचानक घसरण झाली. परिणामी सकाळी गारवा, दुपारी किंचित उकाडा आणि सायंकाळी पुन्हा थंडावा — असे वातावरण सध्या नाशिकमध्ये जाणवत आहे.
वारंवार बदलणाऱ्या या हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले असून, हवामान खात्याने पुढील दोन दिवस अंशतः ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर मात्र नाशिकमध्ये हिवाळ्याची सुरुवात होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
![]()


