नाशिक | दि. २ नोव्हेंबर २०२५: सिटी लिंक बसचालकांचा वाढता बेदरकारपणा नाशिककरांच्या जीवावर बेतू लागला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर संभाजीनगर चौकात शनिवारी (दि. १) सकाळी झालेल्या अपघातात पादचारी बाळू सुखदेव आहिरे (वय ५०, रा. पंचवटी) यांचा सिटी लिंक बसच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर पोलिसांनी बसचालक प्रताप रोकडे (वय २९, रा. सातपूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आडगावच्या स्वामी नारायण चौका सकाळी साडेअकराच्या सुमारास आहिरे हे महामार्ग ओलांडत असताना आडगावकडून द्वारकेच्या दिशेने येणाऱ्या सिटी लिंक बस (क्रमांक एमएच-१५-जीव्ही-७८६९) ने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दरम्यान, शहरात बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरू असताना सिटी लिंक बसचालक मात्र नियमांकडे दुर्लक्ष करून सुसाट वेगात वाहने चालवित असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
सिटी लिंकच्या बसेसचे आतापर्यंत शहरात तब्बल ३४ अपघात झाले असून, या दुर्घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले आहेत. प्रशासनाने तत्काळ या वाहतूक व्यवस्थेतील बेफिकिरीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
![]()


