अनधिकृत बांधकामे, दुकाने, टपऱ्या व होर्डिंग्जवर कारवाईची तयारी; फलकबाजांचे धाबे दणाणले
नाशिक | दि. २७ ऑक्टोबर २०२५: नाशिक महानगरपालिकेने शहरातील मुख्य चौक, प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम आज (सोमवार)पासून पुन्हा सुरू केली आहे. गेल्या काही काळापासून थांबलेली ही मोहीम पुन्हा सुरू होत असून, अतिक्रमणाविरोधात कारवाईची पालिकेने तयारी पूर्ण केली आहे.
दरम्यान, पोलिसांकडून सुरू असलेल्या ‘नाशिक जिल्हा – कायद्याचा बालेकिल्ला’ या गुन्हेगारी नियंत्रण मोहिमेसोबतच आता महापालिकेने अनधिकृत जाहिरात फलक आणि होर्डिंग्जवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे शहरातील फलकबाजी करणाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे.
सिडको, सातपूर आणि नाशिकरोडसह विविध भागांत अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि जाहिरात व परवाने विभागाच्या संयुक्त पथकांकडून कारवाई होणार आहे. अनधिकृत दुकाने, टपऱ्या, हातगाड्या तसेच परवानगीशिवाय लावलेले होर्डिंग्ज आणि बॅनर हटवले जाणार आहेत.
महापालिकेकडे अनेक नागरिकांनी खासगी इमारतींवर व सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना लावण्यात आलेल्या फलकांविषयी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार विभागनिहाय पथके गठीत करण्यात आली आहेत. काही ठिकाणी परवानगी मिळण्यापूर्वीच फलक उभारल्याचे निदर्शनास आले असून, त्यावर तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
दिवाळीत फलकबाजीवर आळा :
यंदा प्रथमच दिवाळी काळात शहरातील प्रमुख चौक, रस्ते, मंदिर परिसर आणि बसथांब्यांवर फलकबाजीला आळा बसल्याचे चित्र दिसले. ‘भाऊ’, ‘अण्णा’, ‘दादा’, ‘बॉस’, ‘एकच सरकार’ अशा घोषणांनी सजलेले फलक लावणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. यात माजी नगरसेविका पुत्र व शिंदे सेनेचे कार्यकर्ते विक्रम नागरे, माजी नगरसेवक पवन पवार, योगेश शेवरे आदींचा समावेश आहे.
या कारवाईनंतर शहरातील चौक व रस्त्यांवरील फलक गायब झाले असून, मुख्य मार्गांवर स्वच्छता आणि मोकळेपणा जाणवत आहे. त्यामुळे वाहतुकीलाही दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790