
नाशिक। १७ ऑक्टोबर २०२५: त्र्यंबकेश्वला दर्शनासाठी निघालेल्या दोघा भावांना रिक्षात बसवून चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारांना गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे १,८८,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील चौकशीसाठी त्यांना सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजता फिर्यादी हे भावासोबत रिक्षाने त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी जात असताना, सातपूरच्या थोडे पुढे गेल्यानंतर रिक्षाचालक व रिक्षात बसलेले इतर दोन इसम यांनी फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील मोबाइल फोन, रोख रक्कम व सोन्याची बाळी असा ऐवज लुटला होता. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-१ चे अधिकारी करत असताना, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस हवालदार संदीप भांड व नाझीमखान पठाण यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, हिरवा शर्ट व काळी पॅन्ट परिधान केलेला रिक्षाचालक आणि त्याच्यासोबत दोन इसम हे मेळा बसस्टँड परिसरात येणार आहेत. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना देण्यात आली.
यानंतर पोलीस हवालदार संदीप भांड, प्रविण वाघमारे, प्रदीप म्हसदे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, विशाल काठे, मिलिंदसिंग परदेशी, तसेच अंमलदार मुक्तार शेख, अमोल कोष्टी, अनुजा येलवे व नाझीमखान पठाण यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.
पथकाने ठक्कर बाजार व मेळा बसस्टँड परिसरात सापळा लावून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे आशिष शशिकांत पगारे (वय २०, रा. सामनगाव रोड, नाशिकरोड), प्रफुल्ल विजय दोंदे (वय २४, रा. ओम नमः शिवाय अपार्टमेंट, सिध्दार्थनगर, फेम थिएटर समोर, नाशिकरोड) आणि अफताब फारूक सय्यद (वय २४, रा. कापुरसिंग चाळ, लोनकर मळा, जयभवानी रोड, नाशिक) अशी सांगितली.
पोलिसांनी तिघांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण १,८८,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
![]()

