
नाशिक। दि. १५ ऑक्टोबर २०२५: मागील भांडणाची कुरापत काढत युवकाचा पाठलाग करत कोयत्याने हल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली. सोमवारी दुपारी ३ वाजता नाग चौक येथे हा प्रकार घडला होता. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली.
चेतन उर्फ किर्या परदेशी असे या संशयिताचे नाव आहे. दुपारी संशयित परदेशी व निरंजन वाघमारे यांनी कृष्णनगर गार्डनजवळ थांबवले व “तुला जास्त माज आला का” असे बोलून युवकाच्या पोटावर कोयत्याने वार केला. युवक पळाला असता संशयित दोघांनी पाठलाग करत कोयत्याने हल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
त्यानंतर पोलिसांनी त्वरित दाखल घेत, संशयित आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचत संशयित आरोपी परदेशी याला भद्रकाली परिसरातून अटक केली.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट १ चे पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, हवालदार वाघमारे, देवरे, विशाल काटे, प्रशांत मरकड, परदेशी, नाझीम पठाण, मुख्तार शेख, संदिप भांड यांच्या टीम ने पार पाडली.
![]()

