नाशिक। दि. १३ ऑक्टोबर २०२५: ‘चोरों के साथ दोस्ती की है, कुत्तों के साथ होली मनायेंगे, धारा ३०२ भी लग सकता है ३०७ समझ के…’ अशा संवादासह हातात कोयता घेऊन सोशल मीडियावर रीलद्वारे दहशत निर्माण करणाऱ्या पाच टवाळखोरांना नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे पथक व लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे नाशिक शहरानंतर नाशिक ग्रामीण पोलिसही आता ‘अॅक्शन मोड’मध्ये आल्याचे चित्र समोर आले आहे.
लासलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रील तयार करणारे संशयित दिंडोरी तालुक्यातील असून ते कामासाठी विंचूर येथे आले आहेत. त्यांनी हातात कोयता घेऊन रील तयार करत दहशत निर्माण केली होती. या घटनेनंतर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.
या पथकासह लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक यांचे पथक व लासलगाव पोलिस यांच्या या कारवाईचे स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी स्वागत केले आहे.
![]()

