नाशिक (प्रतिनिधी): गॅस सिलेंडर सहाशे ते सातशे रुपयांपर्यंत मिळते. मात्र, नाशिकमध्ये आता लवकरच स्मार्ट प्रकल्प अंतर्गत घरोघरी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीने दीडशे किलोमीटरचे रस्ते खोदण्यासाठी महापालिकेचे डॅमेजिंग चार्जेस भरण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे शहरात पर्यावरणपूरक व स्वस्त गॅस उपलब्ध होईलच शिवाय, महापालिकेला देखील याचा आर्थिकदृष्ट्या फायदा होणार आहे.
पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठ्याचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. कारण, एलपीजी गॅसपेक्षा ४० टक्क्यांनी किंमत स्वस्त आहे, त्याचप्रमाणे घरोघरी सिलेंडर पोचवण्याची पद्धतही यामुळे बंद होईल. पाणी मीटरप्रमाणे वापरानुसार बिलिंग यामार्फत आकारण्यात येते, गॅस सिलेंडरसाठी वारंवार नंबर लावण्यापासून नागरिकांची सुटका होईल, स्फोटक गॅस नसल्याने धोका कमी आहे,. त्याचप्रमाणे चोवीस तास उपलब्ध असून, हाताळण्यासही सोपे आहे. एमएनजीएल कंपनीमार्फत आडगाव ट्रक टर्मिनल, मालेगाव स्टँड, पाथर्डी फाटा, विल्होळी नाका या चार स्टेशनसाठी महापालिकेसोबत पंधरा वर्षांसाठी जागेचा करार करण्यात आला आहे. येथे सीएनजी युनिट व रिफलिंग केले जाईल. त्यादृष्टीने पुढच्या टप्प्यात गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदावे लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात शहरांमध्ये दीडशे किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे.
मात्र, रस्ते खोदण्या अगोदर महापालिकेकडे कंपनीला डॅमेज चार्जेस भरावे लागणार असून, डॅमेज चार्जेसमध्ये सवलत मिळावी अशी मागणी एमएनजीएलकडून करण्यात आली होती. मात्र,महापालिकेची आर्थिक परिस्थिती पुणे व मुंबई महापालिकेसारखी सक्षम नाही. त्यामुळे आयुक्त कैलास जाधव व स्थायी समितीचे सभापती गणेश गीते यांनी नकार दिला. त्यामुळे कंपनीने डॅमेज चार्जेस भरण्याची तयारी दाखवली असून, अखेर नॅचरल गॅस पाइपलाइन टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.